अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वत्र प्रचाराचे रणशिंग फुंकले जात असताना, आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना. वणी विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या प्रचार कार्यालयात एका भाजप पदाधिकाऱ्याने कुंभी समाजाच्या बाबत आक्षेपार्ह आणि अत्यंत विवादास्पद वक्तव्य केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
वणी येथील भाजपा नेत्याचे कुंभी समाजाच्या बाबत केलेल्या या वक्तव्यामुळे कुंभी समाजाचे स्वाभिमान दुरवल्या गेल्याने हिंगणघाट विधानसभा मतदार संघात सकल कुंभी समाजाच्या वतीने हिंगणघाट शहरातील नंदोरी चौक येथे यांचा जोडे मारून जोरदार निषेध करण्यात आला.
सोमवारी, ४ ऑक्टोबर २०२४ रोजी वणी बसस्थानक परिसरातील भाजप प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे विविध वरिष्ठ नेते, यांसह आ. संजीवरेड्डी बोदकुरवार आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर उपस्थित होते. उद्घाटनाच्या वेळेस भाजपच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याने सार्वजनिकपणे कुंभी समाजावर अत्यंत अशिष्ट व अपमानजनक टिप्पण्या केल्या. या पदाधिकाऱ्याने, सुधीर साळी यांनी, “कुंभी समाजाच्या लोकांची स्थिती कुत्र्यांसारखी आहे, ते ५०० रुपयांमध्ये विकले जातात, आणि विजेच्या खांबावर मूतणाऱ्या कुत्र्यांसारखी त्यांची अवस्था आहे,” असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला.
यांची माहिती संपूर्ण राज्यात माहिती होताच कुंभी समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. त्यात हिंगणघाट विधानसभा मतदार संघात पण भाजपा नेत्याच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी शेकडो सकल कुंभी समाजाचे नागरिक सहभागी झाले होते. वणी विधानसभा क्षेत्रातील भाजपमध्ये कुंभी समाजाच्या बाबतीत असंतोष निर्माण झाल्याने, आगामी निवडणुकीत भाजपला त्याचे परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे.