संविधान बदलण्याची अफवा, भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला सर्वोच्च मान दिला आहे: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू
नागपूर पल्लवी मेश्राम उपसंपादक
नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन नागपूर: दिं.१६ नोव्हेंबर:- नागपूर शहरातील रामदासपेठ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धर्मपालजी मेश्राम यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा करत पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत भाजपाचे महाराष्ट्र प्रवक्ते चंदन गोस्वामी आणि सुभाष पारधी यांनी देखील आपले विचार मांडले.
केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या धोरणांबाबत सकारात्मक चर्चा झाली. किरेन रिजिजू यांनी सरकारच्या विकासात्मक योजना, राष्ट्रीय सुरक्षेबाबतची वचनबद्धता, तसेच सर्वसमावेशक धोरणांवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “भाजप सरकार हे फक्त निवडणूक जिंकण्यासाठी नाही, तर दीर्घकालीन विकास साधण्यासाठी कार्यरत आहे.”
पुढे आपले विचार सांगत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, “संविधान बदलण्याची अफवा पसरवून काँग्रेस पक्ष जनतेत गोंधळ निर्माण करत आहे. भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला सर्वोच्च मान दिला आहे. आम्ही या संविधानानुसारच देशाचा विकास साधत आहोत. संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”
माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी आपले विचार व्यक्त करत म्हणाले काँग्रेसच्या भूमिकेचा पर्दाफाश करत त्यांनी नमूद केले की, “काँग्रेसच्या राजवटीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा वारंवार अपमान झाला आहे. त्यांनी संविधानाची योग्य अंमलबजावणी करण्याऐवजी समाजात गोंधळ निर्माण करणाऱ्या धोरणांचा अवलंब केला.” अनुसूचित जनजातींशी संबंधित योजनांवर प्रकाश टाकत भाजप सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “भाजपने नेहमीच आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी काम केले असून पुढेही हे कार्य सातत्याने चालू राहील.”
ही पत्रकार परिषद आगामी निवडणुकांसाठी भाजपाच्या प्रभावी रणनितीचा भाग असल्याचे जाणकारांचे मत आहे. यावेळी उपस्थित नेत्यांनी भाजपाचे विजयी अभियान लोकांच्या विश्वासाने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. काँग्रेस पक्षाने पसरवलेल्या “संविधान बदलण्याबाबतच्या” फेक निवेदनावर कडाडून टीका केली.
काँग्रेसचा खोटारडेपणा जनतेसमोर आणण्याचा निर्धार: भाजपाच्या नेत्यांनी काँग्रेसच्या फेक निवेदनांचा पर्दाफाश करण्यासाठी जागरूकता मोहीम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आणि संविधानाच्या महत्वाला अधोरेखित करत संविधान रक्षणासाठी भाजप सरकारची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली.
भाजप सरकारचा संविधानावर ठाम विश्वास: या पत्रकार परिषदेत उपस्थित नेत्यांनी संविधान बदलण्याबाबतचे आरोप पूर्णतः फेटाळून लावले आणि यामागे काँग्रेसचा राजकीय स्वार्थ असल्याचा आरोप केला. त्यांनी स्पष्ट केले की, भाजप सरकार बाबासाहेबांच्या संविधानावर ठाम विश्वास ठेवते आणि त्याच्या माध्यमातूनच देशाचा विकास साधत आहे. “संविधान बदलणार नाही; ते अधिक बळकट करणार!” या घोषणेसह भाजपा नेत्यांनी देशातील संविधानाच्या रक्षणासाठी लोकांचा विश्वास कायम ठेवण्याचे आश्वासन दिले.