पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका आईने आपल्या काही दिवसा अगोदर जन्मलेल्या पोटच्या मुलाला झाडात फेकून पलायन केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. यावेळी या चिमुकल्या बाळाच्या अंगावरिल जखमांना मुंग्या लागल्याने तो जोरजोरात किंचाळत असल्याने ही घटना समोर आली आहे.
एक महिला सरपण गोळा करण्यासाठी गेली असता तिला हुडकेश्वरमधील एका नाल्याच्या काठावरील झाडांमागे रडण्याचा आवाज आला. महिलेने त्या आवाजाच्या दिशेने जाऊन बघितले असता तिला एका कपड्यात गुंडाळलेले बाळ दिसले. त्यानंतर तिने ताबळतोब याची माहिती गावातील नागरिकांना दिली. त्यानंतर काही वेळातच तेथे पोलीस पोहचले. पोलिसांनी त्या बाळाला ताब्यात घेतले. डोक्याला किरकोळ मार लागल्यामुळे बाळ रडत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी या बाळाला उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल केले. सध्या या बळावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पवनसूत नगर येथून पुढे आली आहे.
पोलिसांन कडून प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सकाळच्या दरम्यान पवनसूत नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ एक महिला सरपण गोळा करण्यासाठी गेली असता ती नाल्याच्या काठावर सरपण गोळा करीत असताना तिला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. महिलेने जाऊन बघितले. तेथे तिला चिमुकले बाळ दिसले. महिलेने तेथून बाहेर येऊन अन्य नागरिकांना माहिती दिली. ग्रामपंचायत सदस्य विनोद परिहार हे काही नागरिकांसह तेथे गेले. बाळ बघताच पोलिसांनी माहिती दिली. काही वेळातच हुडकेश्वरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर हे पथकासह पोहचले. त्यांनी जवळपास 30 ते 40 दिवस वय असलेल्या बाळाला ताब्यात घेतले. बाळच्या अंगावर चिखल उडालेला होता तर डोक्याला किरकोळ मारही लागला होता. बाळच्या अंगावरील जखमांना मुंग्या लागलेल्या होत्या. महिला पोलिसांनी त्या बाळाला स्वच्छ केले. ते बाळ उपाशी असल्यामुळे रडत असल्याचे लक्षात आले. लगेच मेडिकल रुग्णालयात दाखल केले. त्या बाळावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असून सध्या प्रकृती ठिक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपी माते विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 93 (जन्म दिलेल्या अपत्याचा सांभाळ न करता उघड्यावर फेकून पळ काढणे) प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलीस त्या आरोपी मातेचा शोध घेत आहेत.
अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म? परिसरातील अविवाहित तरुणीला अनैतिक संबंधातून गर्भधारणा झाली असावी व त्यातून त्या बाळाचा जन्म झाला असावा, त्या बाळाच्या जन्माची बाब लपण्यासाठी त्या मातेने बाळ नाल्याच्या काठावर सोडून पळ काढला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. हुडकेश्वर पोलिसांनी पवनसूतनगराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. त्यावरुन बाळाच्या आई-वडील, नातेवाईकांचा शोध सुरु आहे. बाळाची प्रकृती ठिक झाल्यानंतर त्याला अनाथालयात ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.