वैशाली गायकवाड पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पिपरी-चिंचवड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये असलेल्या प्रेमिकेची तिच्याच प्रियकराने निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. जयश्री मोरे असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून याप्रकरणी आरोपी दिनेश ठोंबरे याला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. हा हत्येचा प्रकरणात आरोपी दिनेशची पत्नी पल्लवी दिनेश ठोंबरे आणि मेहुना अविनाश टिळे हे देखील सहभागी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल आहे. त्यांना देखील वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी दिनेश ठोंबरे आणि हत्या करण्यात आलेली जयश्री मोरे मागील 5 वर्षांपासून लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांना अडीच वर्षाचा ‘शिव’ नावाचा मुलगा देखील आहे. जयश्री गेल्या काही दिवसांपासून वेगळं राहायचं तगादा लावत होती. सतत पैशाची मागणी करत होती. जयश्रीला दिनेशच्या पत्नीसोबत भेटून बोलायचं म्हणत होती. अखेर 24 नोव्हेंबर रोजी म्हणजेच रविवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान दिनेशची पत्नी पल्लवी आणि जयश्री अडीच वर्षीय मुलासह भुमकर चौकात भेटले. याच सुमारास भर रस्त्यावर जयश्रीने प्रियकर दिनेश याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद चारचाकी गाडीत बसून मिटवण्याचा दिनेशने प्रयत्न केला. परंतु, प्रेयसी जयश्री मोरे ही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. प्रियकर दिनेश ठोंबरे याने पत्नी आणि अडीच वर्षीय शिव समोरच प्रेयसीच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केली.
आरोपीच्या पत्नीने मृतदेहाची लावली विल्हेवाट: आपल्या नवऱ्याने सवतेची हत्या केल्याचे दिसून येताच आरोपी दिनेशच्या पत्नीने आपल्या सवतेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पल्लवीने मेहुणा अविनाश टिळे याला फोन करून बोलवून घेतलं. दिनेश आपल्या पत्नी, मेहुणा आणि अडीच वर्षीय शिवसह चारचाकी गाडीतून साताऱ्यातील खंबाटकी घाटात गेले. त्या ठिकाणी जयश्री मोरेचा मृतदेह फेकून देण्यात आला. दुसऱ्या दिवशी 25 नोव्हेंबर रोजी अडीच वर्षीय शिवला आरोपी दिनेश ठोंबरे आणि पल्लवीने आळंदीतील कार्तिकी यात्रेत बेवारस सोडून दिलं. दरम्यान, शिव पोलिसांना सापडला आणि त्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस येण्यास सुरुवात झाली.
लिव्ह पार्टनर बेपत्ता झाल्याचा रचला बनाव: लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जयश्री मोरे ही बेपत्ता असल्याची तक्रार आरोपीने वाकड पोलीस स्टेशन मध्ये दिली आणि ती बेपत्ता असल्याचा बनाव दिनेशने रचला. परंतु, काही तासांनीच जयश्री मोरेचा मृतदेह सातारा पोलिसांना मिळाला आणि दिनेशचे बिंग फुटलं. वाकड पोलिसांना हे सर्व प्रकरण समजल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी दिनेश ठोंबरे यांच्यासह पत्नी पल्लवी ठोंबरे आणि मेहुना अविनाश टिळे याला बेड्या ठोकल्या असून या घटनेचा तपास पोलिस करत आहे.
अडीच वर्षीय शिव झाला अनाथ: आईची हत्या करण्यात आल्याने अडीच वर्षीय शिव जयश्री मोरे हा अनाथ झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.