श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील परळी शहरातील एका डॉक्टरने आपल्या रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या 21 वर्षीय रुग्ण तरुणीची छेड काढून तिच्यावर विनयभंग प्रयत्न केल्याच्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या संतापजनक प्रकरणी पोलीस स्टेशन मध्ये काल दि.29 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत संतप्त जमावाने ठिय्या मांडून आंदोलन करून कारवाईची मागणी केली. परळी शहरातील डॉक्टर यशवंत देशमुख यांचे जनरल फिजिशियन हॉस्पिटल आहे. याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलेल्या तरुणीचा छेड विनयभंग केल्याचा आरोप तरुणीने केला.
21 वर्षीय रुग्ण तरुणीची छेड काढून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्या प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टरला तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणाच्या निषेधार्थ व संबंधित डॉक्टरच्या अटकेसाठी आज दिनांक 30 शनिवार परळीत कडकडीत बंद पाळण्यात आला.
याबाबत पोलीस अधीक्षक बीड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि.29 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास परळी शहरातील एका रुग्णालयात 21 वर्षीय तरुणी तपासणीसाठी गेली होती. यावेळी वैद्यकीय तपासणीचे निमित्ताने या डॉक्टरने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिने त्यास निकराचा विरोध केल्याने तिला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना संबंध वैद्यकीय क्षेत्रास काळिमा फासणारी असुन महिला भगिनीवर अत्याचार करणारी आहे. या घटनेबाबत पीडितेने पोलिसात फोनवरून तक्रार केली.
या प्रकरणात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात हयगय व कसूर जाणीवपूर्वक केली. कर्तव्यात कसूर केलेल्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर संशयित आरोपीस मदत केल्याकामी फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या प्रकरणी डॉक्टरला तात्काळ अटक करावी. याबाबत वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्यात यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.
या घटनेच्या निषेधार्थ आज दि.30 रोजी परळी शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. सकाळपासूनच परळी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी डॉक्टर विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले हे करीत आहेत.