आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- कालिचरण महाराज यांनी धर्मसंसदेत जातीय तेढ निर्माण करणारे भाषण केले होते. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. या प्रकरणी वर्धा पोलिसांनी त्यांना अटक केली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने बुधवारी जामीन अर्जावर सुनावणी होती. यावेळी न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कालिचरण महाराजाच्या जामीन अर्जावर सोमवार 7 फेब्रुवारी रोजी निर्णय घेणार असल्याचे आदेश दिले होते.
कालिचरण महाराजाचे वकील विशाल टिबडेवाल आणि ॲड. मोरवाल यांनी आरोपीला पोलीस विभागाने कुठलीही नोटीस बजावली नाही. त्यामुळे आरोपीची अटक ही बेकायदेशीर आहे. 25 डिसेंबर 2021 रोजी रायपूर येथे घटना घडली आणि वर्ध्यात 29 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणण्यात आला. वर्ध्यात अशी कुठलीच घटना घडलेली नाही. ठाणे आणि पुणे न्यायालयानेही आरोपीला जामीन मंजूर केला होता.
आध्यात्मिक व्यक्ती आरोपी असल्याने या गुन्ह्यात चुकीच्या पद्धतीने द्वेषपूर्ण सहभाग नोंदविला गेल्याने जामीन मंजूर करावा, असा युक्तिवाद केला, तर सरकार पक्षातर्फे जर आरोपीला जामीन मंजूर केला, तर फिर्यादी, साक्षीदार व पुरावे बाधित होण्याची शक्यता आहे. तसेच कालिचरण यांचे आक्षेपार्ह विधान हे धार्मिक जातीय हिंसाचाराचे होते आणि भविष्यात धार्मिक जातीय हिंसाचार होण्याची शक्यता असल्याने जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद केला. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात सोमवार 7 फेब्रुवारी रोजी निर्णय घेण्याचे ठरविले आहे.