अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- 2014 पासून EVM च्या माध्यमातून भाजपने देशाची सत्ता हातात घेतली, महाराष्ट्रातही राक्षसी बहुमताने महायुतीने सरकार बनविले, असे असले तरी evm विरोधात जनतेत असंतोष निर्माण झाला आहे आणि ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. परंतु देशपातळीवरचा मोठा असलेला काँग्रेस पक्ष मात्र evm विरोधात गंभीर दिसत नाही, असा घणाघाती आरोप वंचितचे हिंगणघाट तालुकाध्यक्ष विवेक कांबळे यांनी केला आहे.
शासकीय विश्रामगृह हिंगणघाट येथे विधानसभा निवडणूक निकालाची समीक्षा व evm विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविणे या विषयावर हिंगणघाट – समुद्रपूर-सिंधी रे. विधानसभा क्षेत्राची बैठक बोलविण्यात आली होती, तेव्हा अध्यक्ष स्थानावरून विवेक कांबळे बोलत होते. सदर बैठकीला जेष्ठ नेते अशोक रामटेके, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंगलाताई कांबळे, समुद्रपूर तालुकाध्यक्ष राजू धाबर्डे, रवि कांबळे शहर प्रमुख, कुणाल वासेकर, पंकज भगत, आश्विन तावाडे, सागर भजबुजे, मंगेश मानवटकर, सिध्दार्थ जमानकर इत्यादि प्रमुख पदाधिकाऱ्यासहित कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
पुढे बोलताना विवेक कांबळे म्हणाले की evm ने देशातील चळवळी संपविण्याचे काम सुरु केले आहे, त्यामुळे देशपातळीवर कम्युनिष्ठ व आंबेडकरी चळवळ संपल्याचे चित्र आहे. याचा महाराष्ट्रात मोठा फटका वंचित बहुजन आघाडीला बसला आहे. तरीही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांनी संघर्ष सुरूच ठेवला आहे. आता त्यांनी evm विरोधी लढ्याचे रणशींग फुंकले असून पहिल्या टप्यात महाराष्ट्रभर स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे.
evm च्या हताशेपोटी काँग्रेसचे आमदार खासदार व अनेक मातब्बर नेते भाजपवासी होत आहेत. हे असेच सुरु राहिल्यास भारतात भाजपची एकपक्षीय राजवट येण्यास वेळ लागणार नाही. ही बाब ओळखून काँग्रेसने evm विरोधात पुढाकार घेऊन मोठे आंदोलन उभे करावे असेही कांबळे म्हणाले. बैठकीचे प्रस्ताविक रवि कांबळे, संचालन पंकज भगत तर आभार अशोक रामटेके यांनी केले.
आज दुपार पासून हिंगणघाट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याजवळ वंचित बहुजन आघाडीतर्फे evm विरोधी स्वाक्षरी मोहीम सुरु होत आहे, तेव्हा कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आव्हान सुद्धा करण्यात आले आहे.