पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- नागपूरात 16 डिसेंबर पासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. पण काही दिवसापूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम विरोधात अनेक नागरिकांनी आरोप केला होता. त्यात महा विकास आघाडी मधील पण अनेक नेत्यांनी ईव्हीएम वर भाष्य करून संशय व्यक्त केला जात आहे.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला म्हणजेच 15 डिसेंबर रोज रविवारी नागपुरात ईव्हीएम विरोधात भव्य रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी 12.00 वाजता महाल मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात होईल त्यानंतर मेडिकल चौकातील राजाबक्षा मैदानावर या रॅलीचे समारोप होऊन त्यानंतर जाहीर सभा होणार आहे.
15 डिसेंबर रोजी नागपुरात ईव्हीएम विरोधात इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम फोरमतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, उद्धव सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री सुनील केदार, आमदार नितीन राऊत, आमदार विकास ठाकरे, आमदार संजय मेश्राम, खासदार श्यामकुमार बर्वे, ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाचे नेते ॲड. महमूद प्राचा, इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम फोरमच्या राष्ट्रीय समन्वयक ॲड. स्मिता कांबळे आदी सहभागी होतील. लोकशाही व संविधान वाचविण्याच्या या ईव्हीएम विरोधी लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमचे राष्ट्रीय निमंत्रक प्रितम बुलकुंडे, राष्ट्रीय ऑर्गनायझर ॲड. आकाश मून यांनी केले आहे.
महाविकास आघाडीतर्फे राज्यात विविध भागात ईव्हीएम विरोधात आंदोलने, धरणे सुरू आहेत. महायुती सरकार लोकशाही मार्गाने नव्हे तर ईव्हीएमच्या गैरवापरातून सत्तेवर आले आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे नागपूरात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ईव्हीएम विरोधीत रॅलीत सहभागी होऊन सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा मानस आहे.