रवींद्र भदर्गे जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- येथून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. येथे शनिवारी झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. नवा रोड परिसरात दुपारी 4.00 वाजताच्या दरम्यान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बस आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला.
प्राप्त माहितीनुसार, मालेगावहून रापमची बस माहूरगडला जायला निघाली होती या बस मध्ये एकूण 60 प्रवासी प्रवास करीत होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बस आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी ट्रकचालक निष्काळजीपणे गाडी चालवत असल्याचा दावा प्रवाशांनी केला.
या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांना कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. यावेळी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात 4 प्रवाशाच्या जागीच मृत्यू झाला, तर 24 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व जखमींना जालना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ट्रकचालक दारूच्या नशेत असल्याचा आरोपही प्रवाशांनी केला. पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली असली तरी त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. हा अपघात स्थानिक नागरिक आणि प्रवाशांसाठी वेदनादायी अनुभव होता. रस्ता सुरक्षा नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी प्रशासनाला केले आहे.