आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या धनकवडीतील काशीनाथ पाटील नगर येथे आंघोळीला मला जायचे आहे, असे सांगितल्यानंतरही मुलाला आंघोळीला पाठविल्याने चिडलेल्या सासुने सुनेच्या दंडावर, हातावर पायाच्या मांडीला जोरात चावा घेऊन जखमी केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास समोर आली. याबाबत 37 वर्षाच्या सुनेने सहकारनगर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी 60 वर्षाच्या सासुविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांन कडून प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी महिला या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांना अनेक लोकांशी बोलावे लागते. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांशी फिर्यादीचा संबंध जोडून त्यांची सासु सूनेवर संशय घेऊन मारहाण करत असते. फिर्यादी यांच्या मोठ्या मुलाला शाळेत जायचे असल्याने त्यांनी मुलाला उठवून आंघोळीला जाण्यास सांगितले होते. त्यावर सासु भडकून म्हणाली मला जायचे आहे. तेव्हा फिर्यादी म्हणाल्या की, मुलाला शाळेत जायचे आहे, म्हणून त्यांनी मुलाला बाथरुममध्ये पाठवले. त्याचा सासुला राग आला. त्यांनी शिवीगाळ करत सुनेला हाताने मारहाण करायला सुरुवात केली. मारता मारता सुनेच्या डाव्या हाताच्या दंडाला, हाताच्या अंगठ्याला, पायाच्या मांडीला जोरात चावा घेऊन जखमी केले. सासुच्या या त्रासामुळे शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सासू विरोधात तक्रार दाखल करून घेतली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार शिवतरे करीत आहेत.