राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना जानेवारी 2025 अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी होणार संपूर्ण महाराष्ट्रातील बसस्थानकावर उद्घाटन
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- एसटी महामंडळ हे प्रवाशांना किफायतशीर, सुलभ आणि सुरक्षित प्रवासाची हमी देत असून त्यांच्या चालकांना अपघात होऊ नये म्हणून चालकांसाठी उजळणी प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, मद्यपान तपासणी, ई . मोहीम राबवून एसटीचे अपघात कमी व्हावे, यासाठी प्रयत्नरत असते.
देशामध्ये रस्ता अपघातामध्ये मृत पावणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असल्याने आणि एसटी महामंडळाचे अपघात कमी होण्याच्या दृष्टीने प्रवाशांमध्ये तसेच एसटी चालक वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी, म्हणून दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये रस्ता सुरक्षितता अभियान राबविण्यात येते. यावर्षी हे अभियान राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येत असून त्याअंतर्गत प्रवासी आणि एस.टी. चालक, वाहक, यांत्रिक आणि रा.प.कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी. हा त्या मागील उद्देश आहे. एसटीच्या चालक वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुयोग्य राखण्यासाठी वैद्यकीय तपासणी नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.
दरवर्षी रस्ता अपघातामध्ये मरणाऱ्या लोकांची संख्या ही इतर महामारी रोगापेक्षा जास्त असल्यामुळे लोकांमध्ये आणि वाहन चालकांमध्ये रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती व्हावी, म्हणून आता संपूर्ण भारतभर केंद्रीय महामार्ग व वाहतूक मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना- जानेवारी 2025 साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत एस.टी. कर्मचारी यांची मद्यपान तपासणी करणे, चालकांना सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे, रस्ता वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देणे, रस्ते अपघात कमी करणे, याबाबत माहे जानेवारी 2025 मध्ये महिनाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हिंगणघाट आगार, रेनबो ब्लड बँक नागपूर, येस हॉस्पिटल, नागपूर आणि युनिक आय केअर ऑप्टिकल अँड क्लिनिक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रा.प. हिंगणघाट आगारामध्ये एस.टी. कर्मचारी आणि प्रवाशांसाठी दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये 26 प्रवासी व रा.प. कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले असून 180 चालक, वाहक , रा.प. कर्मचारी आणि प्रवाशी बांधवांनी नेत्र तपासणी व आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. यासाठी रेनबो ब्लड बँकचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी भांगे, येस हॉस्पिटल च्या वंदना कडू आणि युनिक आय केअर ऑप्टिकल अँड क्लिनिकच्या संचालिका दर्शना धाधरे यांच्या संघाच्या मदतीने मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी करण्यात आली होती.
या शिबिराचे आयोजन करण्यासाठी गौतम शेंडे आगार व्यवस्थापक हिंगणघाट, जयंत सडमाके सहाय्यक वाहतूक अधीक्षक, श्री मनोहर वाणे वाहतूक निरीक्षक हिंगणघाट, प्रशांत अरतपायले, संजय भुसारी वाहतूक नियंत्रक यांनी सहाय्य केले.
दिनांक 11 जानेवारी 2025 शनिवारला हिंगणघाट आगारामध्ये सुरक्षितता अभियान 2025 चे उद्घाटन करण्यात येणार आहे.