प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- लाडकी बहिण योजना राबवत महायुती ने राज्यात सत्ता काबीज केली. पण लाडक्या बहिणींना 2100 रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. ते अजून पर्यंत देण्यात आले नाही याबाबत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी केली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रात नमूद केले की, राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुका होऊन दोन महिने लोटले. आता शासनाला लाडक्या बहिणींचा विसर पडला आहे. त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही.
लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासन शासनाने तत्काळ पूर्ण करावे. छाननीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत. असे झाल्यास आम्ही राज्यात मोठे आंदोलन उभे करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

