शांतता व सलोखा राखण्याचे एसडीपीओ कोकाटे यांचे आवाहन.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*अहेरी*:- अहेरी पोलीस स्टेशन येथे शनिवार 22 मार्च रोजी सर्वधर्मीय जातीय सलोखा राखण्यासाठी शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शांतता बैठक अहेरी पोलीस स्टेशनच्या सभागृहात प्राणहिता पोलीस उपमुख्यालयातील उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार होते.
या प्रसंगी एसडीपीओ अजय कोकाटे यांनी, येणारे दिवस हे रमजान ईद व अन्य सणासुदीचे असून सर्वांनी ईद व अन्य विविध सन व उत्सव एकोप्याने साजरे करून जातीय सलोखा व शांतता राखण्याचे आवाहन केले आणि सामाजिक स्वास्थ बिघडू नये यासाठी विविध उदाहरणासहित महत्त्व पटवून दिले.
याचवेळी पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी, आपला देश विविधतेने नटलेला असून एकात्मता, प्रेम, बंधुता हे कायमचे टिकून राहणे काळाची गरज असून यातून एकतेची झालर दिसून येते आणि कोणताही जातीय भेदभाव न करता या पृथ्वीतलावर सर्वांचे रक्त लाल असून केवळ स्त्री आणि पुरुष हे दोनच जाती आहेत, त्यामुळे भेदभाव, श्रेष्ठ-कनिष्ठ न ठेवता प्रत्येकानी गुण्यागोविंदाने व सौहार्दपणे नांदण्याचे मोलाचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी केले.
विशेषतः समाज माध्यमात (सोशल मिडिया) कोणतेही अफवा पसरविण्याचे , विनाकारणचे व नकारात्मकता पडसाद उमटतील असे संदेश पोस्ट कुणीही करू नये आज सर्व यंत्रणा विकसित झाली असून चुकीचे , सामाजिक स्वास्थ बिघडविणारे सोशल मीडियात पोस्ट झाल्यास त्याला फॉलोअर्स करणारे सर्व साखळी लगेच सापडतात त्यामुळे सर्वांनी सावधगिरी व दक्षता बाळगण्याचेही आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले.
या बैठकीला प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम, शाहीन हकीम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख, अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, नगर सेवक अमोल मुक्कावार, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे, रवि नेलकुद्री, कैलास कोरेत, संतोष मद्दीवार, सेवा निवृत्त मुख्याध्यापक शफीक शेख, तालीफ सैय्यद, मखमूर शेख आदी व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

