सफाई कामगार कर्मचाऱ्याला अहेरी पोलिसांनी केली अटक.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809
अहेरी(गडचिरोली):- अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळेत एका सफाई कामगार कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालकांच्या तक्रारीवरून अहेरी पोलिसांनी अजय रमेश चंद्रागिरीवार नामक कर्मचाऱ्याला अटक करत गुन्हा दाखल केला आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींना प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने प्रत्येक तालुक्यात एक अशी शासकीय निवासी शाळा सुरू केली. अहेरी तालुका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वांगेपल्ली येथे देखील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा चालवली जात आहे. २०११ पासून सुरू असलेल्या या शाळेत ५वी ते १०वीपर्यंत शिक्षण दिले जात आहे. या ठिकाणी मुला-मुलींसाठी स्वतंत्र निवासाची सोय आहे.
शनिवारी विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आलेल्या पालकांना येथील सफाई कामगार अजय रमेश चंद्रागिरीवार याने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
सफाई कामगार कडून अनेक मुलांना मारहान करण्यात आल्याची माहिती मानवाधिकार आयोगाचे जावेद अली, CPI चे सचिन मोतकुरवार व मनसे जिल्हा उपाध्यक्ष सोनल वाकुलकर यांना मिळताच क्षणाचाहि विलंब न करता सदर निवाशी शाळा गाठले आणि विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या सफाई कामगाराला मनसे स्टाईलने धडा शिकवण्यात आले आणि अहेरी पोलीसांचा स्वाधीन करण्यात आले.
यावेळी संतप्त पालकांनी सुद्धा अहेरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सदर कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
तालुक्यातील वांगेपल्ली येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध निवासी शाळेत मोबाईल चोरीचा आरोप करत येथील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची तक्रार प्राप्त झाली. संबंधित कर्मचारी अजय चंद्रगिरीवार याला ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
-हर्षल एकरे, ठाणेदार अहेरी

