मधुकर गोंगले उपसंपादक
मो. नं. 9420751809.
गडचिरोली, ता. १२ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘स्वच्छ आणि आधुनिक महाराष्ट्र’ या संकल्पनेतून प्रेरणा घेत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने गडचिरोली नगर परिषदेला अत्याधुनिक स्वयंचलित स्वीपिंग मशीन उपलब्ध करून दिली आहे. या मशीनचा लोकार्पण सोहळा गुरुवारी (ता. १२) आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालय (कर्तव्य कक्ष) येथे पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. अशोक नेते होते, तर उद्घाटन आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे उपाध्यक्ष नटराजन एम., भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, आरोग्य व स्वच्छता सभापती मुक्तेश्वर काटवे, गटनेते तथा बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, शिक्षण सभापती हर्षल गेडाम, नगरसेविका योगिता पिपरे, वर्षा शेडमाके, नगरसेवक रमेश चौधरी, सतीश विधाते, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, समन्वयक प्रमोद पिपरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात आमदार डॉ. मिलिंद नरोटे म्हणाले की, “मुंबईसारख्या मोठ्या शहरांतील स्वच्छ रस्ते आणि कार्यप्रणाली पाहून गडचिरोलीतही जागतिक दर्जाच्या सुविधा असाव्यात, हा माझा ध्यास होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या विकासासाठी तयार केलेल्या ५० वर्षांच्या रोडमॅपमधील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.” लॉयड्स मेटल्सच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केलेल्या विशेष पाठपुराव्यानंतर सामाजिक बांधिलकीतून ही मशीन उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल त्यांनी कंपनीचे आभार मानले.
विशेष म्हणजे या मशीनसाठी लागणारे इंधन, चालक आणि संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी लॉयड्स मेटल्स कंपनीकडूनच पार पाडली जाणार असून नगर परिषद केवळ देखरेख करणार आहे.
(“ऑटोमॅटिक स्वीपिंग मशीन ही रस्ते, मैदाने आणि औद्योगिक परिसर स्वच्छ करण्यासाठी वापरली जाणारी आधुनिक यंत्रणा आहे.
मोठ्या फिरत्या ब्रश आणि व्हॅक्यूम सिस्टममुळे कचरा व धूळ प्रभावीपणे गोळा केली जाते. धूळ नियंत्रणासाठी पाण्याची फवारणी केली जाते.
गोळा झालेला कचरा मोठ्या टाकीत साठवला जातो. कमी वेळात मोठा परिसर स्वच्छ करण्याची या मशीनची क्षमता आहे.”)
अध्यक्षीय भाषणात माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी गडचिरोली शहराला ‘स्मार्ट आणि स्वच्छ’ बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक असल्याचे सांगितले. या स्वयंचलित मशीनमुळे रस्ते सफाई अधिक वेगाने, प्रभावीपणे आणि धूळमुक्त पद्धतीने होईल. कॉर्पोरेट क्षेत्राच्या सीएसआर उपक्रमातून मिळणारा हा सहभाग शहर विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असे ते म्हणाले.
कार्यक्रमादरम्यान नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात सोहळा पार पडला.————–

