मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. न. 9420751809.
अहेरी परिसरात वादग्रस्त बांधकाम पाडण्याच्या कारवाईवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. संबंधित बांधकाम मालकाच्या म्हणण्यानुसार, दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी कोणतीही पूर्वसूचना, आदेश किंवा नोटीस न देता त्यांचे बांधकाम पाडण्यात आले. या कारवाईमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाबाबत यापूर्वीच मुंबई हाय कोर्ट नागपूर बेंच येथे सुनावणी झाली होती. न्यायालयाने दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी जैसे थे (status quo) ठेवण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, हे आदेश अस्तित्वात असतानाही बांधकामावर कारवाई केल्याचा आरोप होत आहे.
या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी संबंधित कारवाई ही न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन असल्याचे सांगत न्यायालयाचा अवमान झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही अजय कंकडालवार पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

