मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यासारख्या लहानशा तालुक्यातून असलेले आणि आज पत्रकारितेच्या क्षेत्रात उंच शिखर गाठलेले नाव म्हणजे महेश भाऊ तिवारी. 30 वर्षांच्या अविरत प्रवासात अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले महेश भाऊ यांची कितीही प्रशंसा केली तरी ती कमीच आहे.
ग्रामीण भागाचा खरा आवाज बनले महेश भाऊ: मी स्वतः त्यांच्या सोबत अनेकदा ग्रामीण भागात प्रवास केला आहे. रस्ते,शिक्षण, आरोग्य,वीज,पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा प्रत्येक खेड्यापाड्या पर्यंत पोहोचाव्यात या साठी त्यांची धडपड मी जवळून पाहिली आहे. सिरोंचा तालुक्याला टीव्हीवर दाखवण्याची तळमळ ते नेहमी बाळगायचे आणि त्यांचा प्रवास कुठून सुरू झाला, हे ते प्रवासात नेहमी सांगायचे.त्यांचा प्रवास ऐकून मन हेलावून जायचे.
नक्षल बातम्या कव्हर करताना गनदाट जंगलातून प्रवास करून ग्राउंड झिरोवर पोहोचणं, पोलिसांनी नक्षलवाद्यांचा कशा पद्धतीने खात्मा केला याची माहिती जीव धोक्यात घालून जगासमोर आणणं हे मी प्रत्यक्ष पाहिलंय. जिथे प्यायला पाणी मिळत नाही, खायला काही नाही,अशा ठिकाणी फक्त बिस्किटावर दिवस काढून त्यांनी अनेकदा कव्हरेज केलं आहे. बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजातही कॅमेरा स्थिर ठेवणारा हा पत्रकार मी जवळून बघितला आहे.
टीव्हीच्या माध्यमातून बदल घडवणारी पत्रकारिता: झिंगानूर सारख्या गावातील पाण्याची समस्या असो,अहेरी तालुक्यातील लंकाचेन गाव जिथे रावणाने जाळलेल्या लंकेसारखी व्यथा होती ती व्यथा त्यांनी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर मांडली. रेगुंटा परिसरातील मायाबिनपेटा आरोग्य केंद्रात मागील वर्षी डेंग्यूने थैमान घातले होते.रुग्णांना योग्य उपचार मिळत नव्हते,ऑक्सिजनची कमतरता होती.या समस्येला वाचा फोडून, बातमी प्रसिद्ध करून महेश भाऊंनी जिल्हा प्रशासनाला अलर्ट केलं आणि प्रशासनाला ॲक्शन मोडवर आणलं.अशा एक नाही, अनेक समस्या त्यांच्या पत्रकारितेमुळे मार्गी लागल्या.
सर्वोत्कृष्ट ग्रामीण पत्रकाराचा सन्मान: ग्रामीण भागातील अशा ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दलच महाराष्ट्र टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन (TVJA) तर्फे महेश भाऊ तिवारी यांना सर्वोत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.माजी लष्कर प्रमुख जनरल श्री.मनोज नरवणे व वित्त राज्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे सह पालकमंत्री श्री.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते हा गौरव स्वीकारताना गडचिरोलीची मान अभिमानाने उंचावली.
महेश भाऊ तुमच्या 30 वर्षांच्या प्रामाणिक पत्रकारितेला,तुमच्या निष्ठेला आणि ग्रामीण भागासाठीच्या तळमळीला माझा सलाम.तुम्ही फक्त पत्रकार नाही, तर गडचिरोलीचे खरे लोकसेवक आहात. तुमच्या सोबत प्रवास करायला मिळणं हे माझं भाग्य आहे.
महेश भाऊ तुम्हाला खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

