मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवरून _माजी राज्यमंत्री तथा आमदार_ *डॉ. धर्मरावबाबा आत्राम* यांनी महावितरण प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. अहेरी, आलापल्ली, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा परिसरात नियमित मीटर रीडिंग बंद असून, घरपोच छापील वीज बिलेही मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या आलापल्ली विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले. ग्रामीण व दुर्गम भागात मोबाईल नेटवर्कची समस्या असून अनेक गरीब नागरिकांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे “ऑनलाईन बिल पाहा” असे सांगणे म्हणजे जनतेची थट्टा असल्याचे आत्राम यांनी म्हटले आहे. वेळेवर बिल न मिळाल्याने नागरिकांवर अन्यायकारक दंड आकारला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तसेच आलापल्ली वॉर्ड क्रमांक २ मध्ये नवीन डी.पी. (DP) बसविण्याची मागणी वारंवार करूनही अद्याप काम पूर्ण झाले नसल्याने स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रलंबित डी.पी. तात्काळ युद्धपातळीवर बसवाव्यात, नियमित मीटर रीडिंग सुरू करावे आणि प्रत्येक ग्राहकाला घरपोच छापील वीज बिल द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, *मा.तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम* _सिनेट सदस्य गडचिरोली_ यांनीही आलापल्ली येथील महावितरण कार्यालयात धाव घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. बंद असलेल्या मीटरचे चुकीचे बिल तसेच चालू मीटरवर जास्तीचे वीज बिल येत असल्याच्या तक्रारी त्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
यावेळी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावर, तालुका अध्यक्ष नागेश मडावी, पराग पांढरे,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
