दिनांक 15 जानेवारी ते 25 जानेवारी 2023 दरम्यान घरभेटी सर्वेक्षणाद्वारे राबविण्यात येणार गोवर रुबेला लसीकरण.
नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली गोवर-रुबेला रोग नियंत्रणासाठी कार्यवाहीचे नियोजन करण्याकरिता टास्क फोर्सची आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस माता व बालकल्याण अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ, जनसंपर्क कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र कांबळे, सर्व महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी व परिचारिका उपस्थित होत्या.
सदर बैठकीमध्ये दिनांक 15 जानेवारी 2023 ते 25 जानेवारी 2023 या दरम्यान शासन आदेशान्वये मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात गोवर रुबेला संबंधी विशेष लसीकरण मोहीम राबवणार असल्याचे सांगितले. मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 09 महिने ते 5 वर्ष वयोगटातील गोवर रूबेला लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोस करीता वंचित बालकांचा घरभेटी सर्वेक्षणाद्वारे शोध घेऊन त्या बालकांना गोवर-रुबेला रोगाची लागण होऊ नये याकरिता लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सदर वयोगटातील बालकांना ताप, अंगावर पुरळ, सर्दी इत्यादी लक्षणे आहेत का याची तपासणी करून आवश्यकतेनुसार उपचार देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सर्व खाजगी डॉक्टरांना त्यांच्या रुग्णालयात येणाऱ्या बालकांमध्ये गोवर संबंधित लक्षणे आढळल्यास तात्काळ महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांना कळविण्याबाबत आवाहन करण्यात आले.