ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- जिल्हातील पाचोरा व भडगाव तालुक्यासाठी गिरणामाई ही नदी एक मोठी नैसर्गिक देणगीच दिली आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण गिरणामाईच्या पाण्यामुळे पाचोरा, भडगाव तालुक्यातील शेतकरीवर्ग दुबार पीक घेऊन चांगल्याप्रकारे शेती करत आहेत. तसेच याच गिरणा नदीच्या पाण्यामुळे पाचोरा, भडगाव तालुक्यातील शेकडो गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून वाळूच्या लिलावातून दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा होत असतो असे असले तरी मात्र याच नदीतून दरवर्षी लाखो नव्हे तर कोटी रुपये किंमतीची वाळू ही वाळू माफिया महसूल व पोलीस विभागाच्या डोळ्यात धूळ फेक करून चोरटी वाहतूक करतात व यातून अमाप कमाई करत आहेत.
असाच काहीसा प्रकार यावर्षी मोठ्या प्रमाणात सुरु असून पाचोरा व भडगाव तालुक्यातील गिरणा नदीच्या पात्रातून रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर व्दारे वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे. हा वाळूचा होणारा बेसुमार उपसा व चोरटी वाहतूक यामुळे गिरणा नदीपात्रातील वाळू झपाट्याने कमी होत असून नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडून ते पोखरले जात आहे. विशेष म्हणजे आता भ्रमणध्वनी हा एकमेकांशी संपर्क साधण्यासाठीचा चांगला पर्याय असल्याने हे ट्रॅक्टर मालक व चालक वाळूची चोरटी वाहतूक करतांना नदीपात्रापासून तर रस्त्यावर ठिकठिकाणी खबऱ्यांना बसवून महसूल विभागाचे अधिकारी किंवा पोलिस यांच्यावर पाळत ठेवून मोठ्या शिताफीने वाळूची चोरटी वाहतूक करत आहेत.
ही वाळूची चोरटी वाहतूक करण्यासाठी दररोज रात्री नऊ वाजेपासून गिरणा नदीपात्रात वाळू माफियांची जत्रा भरते व वाळू भरुन, भरुन हे ट्रॅक्टर नदीच्या बाहेर काढतांना व रस्त्यावरून चालवतांना कुणाच्याही नजरेत येऊ नये म्हणून लाईट बंद करुन भरधाव वेगाने चालवली जातात व कमी वेळात इच्छीत स्थळी वाळू पोहच केली जाते मात्र याच खेळत बरेचसे अपघात होऊन रस्त्यावर काही निष्पाप वाटसरुंना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काही वेळा वाळूच्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन काही चालक व मजूर जखमी झाले आहेत तर काहींना कायमचे अपंगत्व आले असून काहींनी आपला जीव गमावला आहे मात्र याबाबत अपघाताची कुठेही नोंद किंवा तक्रार न करताच अशी प्रकरणे आर्थिक व्यवहार करुन परस्पर मिटवली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याबाबत कानोसा घेतला असता काही लोकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेली माहिती अशी की नदीपात्राच्या आसपासच्या गावातील सगळेच नाही परंतु (काही) तलाठी, ग्रामसेवक व सरपंच यांना नियमितपणे हप्ता देऊन नदीपात्रातील वाळू उपसा करून दररोज लाखोंची कमाई केली जात आहे. विशेष म्हणजे सद्यस्थितीत भविष्यात येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायतीच्या निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय पाठबळ वाढविण्यासाठी काही सत्तेतील तर काही माजी पदाधिकारी व ज्यांना राजकारणाचे डोहाळे लागले आहेत असे काही जेष्ठ, श्रेष्ठ कार्यकर्ते यांचा वाळू माफियांच्या पाठीवर हात असल्याकारणाने महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी हतबल झाले असल्याचे बोलले जात आहे.
तालुक्यातील परधाडे, बांबरुड, ओझर तसेच नदी काठच्या इतर गाव परिसरातील हद्दीत येणाऱ्या गिरणा नदीच्या वाळू ठेक्याचा लिलाव होण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठराव करण्यासाठी ग्रामसभा घेऊन हे ठराव तहसीलदार व प्रांत कार्यालयाकडे पाठवणे गरजेचे आहे. परंतु अद्यापही असा कोणताही ठराव केला गेला नसल्याने अद्यापही वाळूच्या ठेक्याचे लिलाव झाले नसल्याने व दुसरीकडे घरे व इतर बांधकामासाठी वाळूची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने याच संधीचा फायदा घेत काही भांडवलदार पैश्याच्या व सत्तेच्या बळावर वाळूच्या व्यवसायात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.