संदीप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
नागपूर:- जिल्हा न्यायालय परिसरातून एक खळबजनक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे वकील आणि पोलिस आमनसामने आले आहे.
नागपूर येथील जिल्हा न्यायालयात येण्यासाठी विरुद्ध दिशेने जाणाऱ्या तरुण वकिलाला पोलिस निरीक्षकाने खाली खेचले. त्यात ते वकील जखमी झाल्याने जिल्हा न्यायालय परिसरात पोलिस आणि वकिलांमध्ये चांगलाच राडा बघायला मिळाला. ही घटना दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, पोलिस आणि वकील संघटना आमोरा सामोर आल्याने परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी वकील संघटनांच्या वतीने घोषणाबाजी करून पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्याची मागणी केली.
बबन येडगे असे वाहतूक पोलिस निरीक्षकाचे नाव असून, ते सदर वाहतूक विभागात कार्यरत आहेत. ॲड. तहसीन रजा गुलाम मोहम्मद असे वकिलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ॲड. तहसीन रजा दुचाकीने रॉंगसाईड न्यायालयाकडे येत होते. यावेळी या परिसरात हजर असलेल्या येडगेंनी त्यांना परत जाऊन सरळ मार्गाने येण्यास बजावले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत, ते पळून जात असल्याने येडगे यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. झटापटीत त्यांची कॉलर येडगेंच्या हाती आली आणि गाडीवरून तोल गेल्याने तहसीन खाली पडले. त्यांच्या हाता-पायाला लागले.
परिसरात उपस्थित वकिलांनी रजा यांच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी येगडेंविरोधात घोषणाबाजी करीत कारवाईची मागणी केली. काही वेळातच परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस आणि वकील एकत्र आले. त्यामुळे पोलिस विरुद्ध वकील असा सामना रंगला होता. पोलिस उपायुक्त एम. सुदर्शन आणि सदर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी घटनास्थळी पोहोचले.
पोलिस-वकिलांमध्ये खडाजंगी..
यावेळी पोलिस संरक्षणात येडगे यांना तिथून काढण्यात आले. यानंतर जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष रोशन बागडे, माजी अध्यक्ष कमल सतुजा आणि ॲड. श्रीरंग भांडारकरसुद्धा पोहोचले. त्यांनी पोलिस ठाण्यापर्यंत पायी जात येडगेंविरुद्ध तक्रार दिली.
याप्रकरणी सदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद चौधरी चौकशी करीत आहेत. दरम्यान सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्या कडून या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
पोलिस निरीक्षक येडगेंची ही तक्रार
वकील संघटनेने तक्रार दिल्यावर पोलिस निरीक्षक बबन येडगे यांनीही सदर पोलिस ठाण्यात ॲड. तहसिन रजांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली तक्रार केली. याप्रकरणी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल केलेला नाही.
वाहतूक पोलिस निरीक्षक बबन येडगे या परिसरातील वाहतूक व्यवस्थेचे प्रमुख आहेत. यापूर्वीही अशाप्रकारे रॉंगसाईडने येणाऱ्या वकिलांसोबत त्यांची झटापट झालेली आहे. वकिलाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर चालान करवाई करण्यात यावी, त्याला याप्रकरे जखमी करणे व शिवीगाळ करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. पोलिसांचे हे वर्तन अशोभनीय असल्याचे मत जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. रोशन बागडे यांनी व्यक्त केले.