राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी
मुंबई:- नुसताच झालेल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत पुरेसे संख्याबळ असूनही पहिल्या पसंतीची मते कमी पडल्याने पराभूत झालेले कॉंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाला जबाबदार असलेल्या कॉंग्रेसच्या आमदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. या निवडणुकीत पक्षाच्याविरोधात मदतदान करणाऱ्या सुमारे पाच ते सहा आमदारांची यादी प्रदेश कॉंग्रेसने श्रेष्ठींकडे पाठविली असून लवकर या आमदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
१० जूनला राज्यसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आपले तीन उमेदवार निवडून आणले. त्यानंतर २० जूनला विधान परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीतदेखील पुरेसे संख्याबळ नसताना भाजपाने आपले पाच उमेदवार निवडून आणले. या दोन्ही निवडणुकीत भाजपाने विरोधकांची मते आपल्या बाजूला वळविण्यात यश मिळविले. विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे पाच ते सहा आमदार फुटल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. चंद्रकांत हंडोरे हे पहिल्या फेरीत निवडून येणे अपेक्षित असताना त्यांना तीन मते कमी मिळाल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला.हंडोरे यांचा पराभव कॉंग्रेसच्या आणि हंडोरे यांच्या जिव्हारी लागला. कॉंग्रेस श्रेष्ठींनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय नेतृत्वाने प्रदेश शाखेकडे या साऱ्या प्रकरणाचा अहवाल मागवला. प्रदेश शाखेने अहवाल पाठविला आहे. यात भाजपाला मदत करणाऱ्या सुमारे पाच ते सहा आमदारांची नावे असल्याचे सांगण्यात येत आहे.यामध्ये मुंबईतील दोन, उत्तर महाराष्ट्रातील एक व मराठवाड्यातील दोन ते तीन आमदारांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते
२० जूनला विधान परिषद निवडणुकीनंतर राज्यात राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० तर इतर अपक्ष १० असे तब्बल ५० आमदार गेले. राज्यात सत्ताबदल झाला. एकनाथ शिंदे यांच्याकडे भाजपाने अचानकपणे राज्यातील सत्तेची सूत्रे दिली. मात्र, अजूनही राज्यातील सत्ता नाट्य संपलेले नाही. येत्या काही दिवसात सर्वोच्च न्यायालयात सत्तानाट्याचा निकाल स्पष्ट होईल, असे म्हटले जात आहे.
या साऱ्या राजकीय उलथापालथीमुळे कॉंग्रेसमधील बंडाळीला आळा घालण्यास कॉंग्रेस श्रेष्ठींना उशीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. श्रेष्ठींनी मागविल्यानुसार प्रदेश शाखेने अहवाल आता पाठविला आहे. त्यावर श्रेष्ठींकडून संबंधित आमदारांवर कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात अले आहेत. प्रत्यक्ष कारवाई कधी होणार याबाबत सामान्य कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. पक्ष अडचणीत असताना विरोधकांकडे जाऊन त्यांना मदत करणाऱ्या आमदारांवर काय कारवाई होणार याकडे सामान्य कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.