युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ 9923296442
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी परिसरातील खडक नदीत औद्योगिक परिसरातील कारखान्यातील रसायन युक्त पाणी सोडण्यात येत असल्याने जलप्रदूषण वाढले आहे. त्यामुळे मासोळ्या तसेच इतर जलचर प्राणी मृत्युमुखी पडत आहेत. सोबतच शेती व जनावरांचे आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रसायन युक्त दूषित पाणी खडक नदीमध्ये सोडले जात असल्याने नदी शेजारील शेतजमीनी अडचणीत सापडल्या आहेत. रसायनामुळे नाल्यातील पाण्याचा रंग काळाभोर झालेला आहे. या परिसरातील जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून नाल्याचे पाणी जमिनीत झिरपूर विहिरींचे स्तोत्र दूषित झाल्यास शेतीचे ओलित धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. तसेच नाल्याचे पाणी पिल्यानंतर जनावरांना चर्मरोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदर कंपनी मुळे नदीचे दूषित पाणी मानवाला व शेतीला नुकसानदायक ठरणार आहे.
अगोदरच कळमेश्वर शहरातील भूगर्भातील पाणी रसायन युक्त असल्याने शहरवासीयांना बाहेरील पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. शहरातील पाणी घर बांधकाम करण्याच्या सुद्धा कामी येत नसून ज्या नागरिकांनी भूगर्भातील पाणी वापरून घरे बांधले त्यांना अल्पावधीतच तडे गेले आहेत. यामुळे आता खडक नदीत सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे ब्राह्मणी, वरोडा, झुनकी, सावळी (बु), बोरगाव (खुर्द), ब्रह्मपुरी या गावातील भूगर्भातील जलसाठा दूषित झाल्यावर भविष्यात तहान कशी भागवावी असा प्रश्न येथील नागरिकांसमोर उपस्थित राहणार आहे.
यामुळे औद्योगिक परिसरातील कारखान्यांनी दूषित पाण्याची समस्या सोडविण्यासाठी वेळीच उपाययोजना करावी. याकरिता जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी वरोडा येथील शेतकरी बंडु ढवळे, नरेश राऊत, राजू काकडे, प्रशांत डाखोळे, ईश्वर पारसे, दामोदर राऊत आदींनी केली आहे.
फोटो