नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकविल्याचा आरोप शिंदे गटाचे सोलापूरचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांच्या हस्तक्षेपामुळे काम करण्यास अवघड जात असल्याची तक्रार देखील आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे. नर्स संघटनेकडून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे काळजे यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. तर, मनीष काळजे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, नर्स संघटनेला पुढे करत भ्रष्टाचारात अडकलेल्या अधिकाऱ्यांनी माझ्याविरोधात हे कटकारस्थान रचले आहे. असा आरोप त्यांनी केला.
मनीष काळजे हे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक आहेत. नर्स संघटनेकडून त्यांच्याविरोधात जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये, नर्स संघटनांकडून म्हटले गेले आहे की, जिल्हा आरोग्य अधिकारी शितलकुमार जाधव यांच्यासारखी तुमची अवस्था करेल, असं म्हणत धमकावलं जात आहे. तसेच, मनीष काळजे यांचा आमच्या कामात हस्तक्षेप वाढल्यामुळे काम करणे देखील अवघड झाले आहे. असा आरोप महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेने केला आहे. तशी लेखी तक्रार या संघटनेकडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
जर आरोग्य कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर राज्यस्तरीय संघटनेशी संपर्क साधून आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. तसेच आरोग्य विभागा तील दबावतंत्र झुगारून संघटना रस्त्यावर उतरणार आहेत. असा इशारा महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेकडून देण्यात आला आहे. नर्स संघटनेकडून देण्यात आलेल्या या इशाऱ्याने हा वाद वाढण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर बोलताना मनीष काळजे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नर्सेस संघटनेला पुढे करून भ्रष्टाचारात अडकलेल्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यां कडून हे कटकारस्थान रचले जात आहे. माझ्या वरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. निलंबित आरोग्य अधिकारी शितल कुमार जाधव यांच्या प्रमाणेच भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करू.
आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराची कीड आम्ही काढून टाकणार आहोत. तसेच मी अशा बदनामीला अजिबात घाबरत नाही. हे सरकार गोरगरिबांचे सरकार आहे. एखादा आरोग्य अधिकारी संघटनांना पुढे करून असे करत असेल, तर योग्य ती कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही. अशी प्रतिक्रिया या सर्व प्रकरणावर मनीष काळजे यांनी दिली.