एक व्यक्ती आणि एक महिलेचा आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत उल्लेख.
सातारा जिल्हा प्रतिनिधी
सातारा, दि.7 ऑगस्ट:- येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सातारा शहरातील रविवार पेठेतील उमेश रमेश जाधव यांनी रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
मृतक उमेश जाधव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्याने एक पुरुष आणि एका महिला यांनी पोलिसांना पैसे देऊन मला कारागृहात पाठवले; म्हणून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.
काही महिन्यांपूर्वी कौटुंबिक वादातून उमेश यांच्या पत्नीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. या प्रकरणात उमेश हे सातारा जिल्हा कारागृहात 3 महिन्याची शिक्षा भोगत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची जामिनावर सुटका झाली होती. 6 ऑगस्ट या दिवशी दुपारी त्यांनी आत्महत्या केली. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘माझी पत्नी आईकडे गेली होती. तेथून परत आल्यावर तिने आत्महत्या केली. त्यासाठी एक पुरुष आणि एक महिला कारणीभूत आहे. त्या दोघांमुळेच मी आत्महत्या करत आहे. मला कारागृहात टाकण्यासाठी त्या दोघांनीच पोलिसांना पैसे दिले. त्यामुळेच मला शिक्षा झाली असून त्या दोघांवर कलम 302 अन्वये गुन्हा नोंद करण्यात यावा.’ (पोलिसांनी पैसे घेतले का ? याचे अन्वेषण होणार का ? त्यातून पोलीस दोषी आढळले तरी ज्यांनी आत्महत्या केली ते पुन्हा येऊ शकत नाहीत, याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचे अन्वेषण त्वरित करावे आणि संबंधितांना कठोर शिक्षा करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.