मुंबई:- आज देशात मोठ्या प्रमाणात धार्मिकता वाढवून राजकीय पोळ्या लाटण्याचे कार्य सुरू आहे. रोज वाढणारी महागाई आणि युवा तरुणाची बेरोजगारी, जीएसटीच्या प्रश्नांवर आणि ‘ईडी’ वगैरे केंद्रीय तपास यंत्रणांच्या अतिरेकी वागण्यावर काँग्रेस हा एकमेव पक्ष लढा देत आहे. रस्त्यावर उतरत आहे हे चित्र निर्माण झाले आहे व त्याची दखल देशातील अन्य विरोधी पक्षांनी घेऊ नये याचे आश्चर्य वाटते. ते झोपले आहे की काय असं दिसत आहे.
आज देशात महागाई, बेरोजगारी हे विषय फार गंभीर आहेत, पण त्यावर बोलणाऱ्यांना देशद्रोही अथवा धर्मद्रोही ठरवले जाते, असे म्हणत शिवसेनेने केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.
धर्म ही अफूची गोळी आहे व देशातील बहुसंख्य जनतेला रोजच या अफूची मात्रा दिली जात असल्याने जनता एक प्रकारच्या गुंगीतच आहे. महागाईविरुद्ध आंदोलनाची खिल्ली उडवताना भाजपतर्फे हीच अफूची गोळी पुन्हा चारली आहे. महागाई विरोधात काळे कपडे घालून काँग्रेसने आंदोलन केले. याचा संबंध भाजपने अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजनाशी जोडला, असे म्हणत शिवसेनेने टीकेचा बाण सोडला. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर हल्लोबोल केला.
काय लिहल आहे अग्रलेखात?
प्रत्येक समस्या, प्रश्नांचा संबंध धर्माशी जोडणे कितपत योग्य आहे? महागाई-बेरोजगारीचा भस्मासूर उसळला आहेच. आंतरराष्ट्रीय बाजारातील कारणे काहीही असतील. पेट्रोल- डिझेलचे भाव शंभरीवर गेले व त्याचा फटका सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यास बसत आहे. महागाई व बेरोजगारीवर राम मंदिर हा उतारा नाही. राम मंदिर ही श्रद्धा व राष्ट्रीय अस्मिता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने अयोध्येत राम मंदिर होतच आहे. मात्र लोकांनी तुम्हाला सत्ता जी दिली आहे, ती सर्वसामान्यांचे जगणे सुसहय़ करायला.
रेपो दरात वाढ केल्याने गृहकर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, वाहन अशा सर्व प्रकारच्या कर्जांच्या ईएमआयचा बोजा वाढणार आहे. महागाई भडकली असली तरी निमूट त्या आगीत होरपळून मरा. महागाईविरुद्ध बोंब माराल तर याद राखा, असेच केंद्र सरकारचे धोरण आहे. ही हुकूमशाही आहे. लोकशाहीची गळचेपी आहे. त्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली, पण इतर विरोधी पक्ष कोठे आहेत? त्यांची नेमकी भूमिका काय आहे? हे एक रहस्यच आहे, असे शिवसेनेने म्हटलेय.
सर्व विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे
काँगेस नेते राहुल व सोनिया गांधी यांनाही ‘ईडी’ ने घेरले आहे तरी महागाई- बेरोजगारीविरुद्ध ते रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आहेत. अशा वेळी सर्व मतभेद विसरून विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. विरोधकांच्या बेकीतच भाजपचे बळ आहे. विरोधकांनी एकत्र येऊ नये यासाठी ‘ईडी’ची दहशत निर्माण केली जाते, असेही नमूद या अग्र लेखात करण्यात आले आहे.