🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी🖊️
हिंगणघाट:- वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मधील एका 14 वर्षीय मुलीवर आश्रम शाळा मध्ये अत्याचाराच्या घटनेने खळबळ माजली होती. आता अत्याचार केल्याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील एका आश्रमशाळेचे अधीक्षक संजय एकनाथ इटनकर यास अटक करण्यात आली.
पालक चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी
पिडीत अल्पवयीन मुलीचे पालक चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून काही महिन्यांपूर्वी हिंगणघाट शहरात राहायला आलेत. त्यांनी आपल्या मुलीला चंद्रपूर जिल्ह्यातील एक निवासी आश्रमशाळेत शिकण्यासाठी पाठवले होते. दरम्यान, मुलीची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत शाळा प्रशासनाने तिला परत घेऊन जाण्याची सूचना पालकांना केली. त्यानुसार मुलीला घेऊन पालक त्याच दिवशी हिंगणघाटला आले. घरी आल्यावर प्रकृतीची विचारपूस केली असता मुलीने आपल्यासोबत घडलेला अनुचित प्रकार कथन केला. यानंतर पालकांनी मुलीला उपजिल्हा रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणी झाली. त्यात मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हिंगणघाट पोलिसांनी ३७६ व पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करीत इटनकर यास अटक केली.
आरोपीस अटक करून चंद्रपूर पोलिसांकडे सुपूर्द
चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती तालुक्यातील बरांज तांडा येथील गमाबाई निवासी आश्रम शाळेची ही विद्यार्थिनी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तुकाराम पवार अध्यक्ष असलेल्या संस्थेच्या वतीने संचालित ही शाळा आहे. कोरपना व जिवती तालुक्यातदेखील पवार यांच्या आश्रमशाळा, महाविद्यालय व हायस्कूल आहेत. सर्वप्रथम हे प्रकरण भद्रावती पोलीस ठाण्यात गेले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात न घेता संस्थाचालक हे प्रकरण उघडकीस येऊ नये यासाठी प्रयत्नरत होते. परंतु, हिंगणघाट पोलिसांनी अधीक्षक इटनकर याला अटक करताच खळबळ उडाली आहे. हिंगणघाट पोलिसांनी नराधम आरोपीला अटक करून चंद्रपूर पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. पुढील तपास आता चंद्रपूर पोलिस अधिकारी करणार आहे.