जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहन व शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम
✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो .9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.26:- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वर्धा जिल्ह्यात अनेक वर्ष वास्तव्य होते. त्यांच्या वास्तव्य काळात जिल्हा स्वातंत्र्य लढ्याचे देशाचे प्रमुख केंद्र व राष्ट्रीय कार्याचा केंद्रबिंदू होता. चले जाव आंदोलनाची सुरुवात गांधीजींच्या नेतृत्वात वर्धा येथूनच झाली. स्वातंत्र्य लढ्यात जिल्ह्याने महत्वपूर्ण योगदान दिले आहे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.
भारतीय प्रजासत्ताकाच्या 73 व्या वर्धापन दिनाचा मुख्यध्वजारोहन समारंभ जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शुभेच्छा संदेश देतांना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधिक्षक नूरुल हसन, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवळे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे उपस्थित होते.
सुरुवातीस जिल्हाधिकाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या शुरविर, शहिदांना नमन केले. गांधीजींच्या वास्तव्याने पावन झालेला जिल्हा गांधी जिल्हा म्हणुन देखील ओळखला जातो. बापूंचे वास्तव्य असलेले सेवाग्राम हे एक महत्वाचे राष्ट्रीय पर्यंटनस्थळ बनले आहे. देश विदेशातील हजारो पर्यंटक येथे येत असतात. आचार्य विनोबा भावे यांचे पवनार हे अनेक वर्ष वास्तव्याचे ठिकाण होते. या दोनही महापुरुषांच्या जिल्ह्यात आपण वास्तव्य करतोय ही आपल्यासाठी देखील अभिमानाची बाब आहे.
देशाच्या इतिहासात स्वातंत्र्य दिन जितका महत्वाचा आहे, तितकेच महत्व प्रजासत्ताक दिनाचे आहे. दि.26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्विकार करण्यात आला आणि 26 जानेवारी 1950 रोजी देशात घटनेच्या अंमल बजावणीस सुरुवात झाली. हा दिवस आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो. आज जगात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून आपल्या देशाचा गौरव केला जातो. घटनाकारांनी अतिशय दुरदृष्टीने तयार केलेल्या घटनेचे हे फलीत आहे, असे आपल्या शुभेच्छापर संदेशात पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी सांगितले.
सुरुवातीस जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगित व विविध पथकांद्वारे संयुक्त पथसंचलन पार पडले. यावेळी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. पोलिस पथकाच्यावतीने आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या बाबींचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण व मान्यवरांचे सत्कार देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी केले.