युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- आज राज्यात शेतकरी राजा वेळोवेळी येणाऱ्या आस्मानी सुलतानी संकटामुळे हवालदिल होत असताना नागपुर जिल्हातील कळमेश्वर पासून अवघ्या15 किलोमीटर अंतरावर असलेल्या पारडी देशमुख या गावातील यशस्वी शेतकरी श्री. भीमराव केशवराव कडू या शेतकऱ्याने आधुनिक फळबागेची लागवड करत लाखोंचे उत्पन्न घेतले आहे. या प्रयोगशील शेतकऱ्याची ही प्रेरणादायी यशोगाथा.
भीमराव कडू यांच्याजवळ एकूण 35 एकर शेती असून या शेतीमध्ये भीमराव, राजेंद्र, पराग, माधवराव, प्रकाश व प्रशांत हे 6 ही भाऊ सामूहिक शेती करतात. यामध्ये संत्रा बगीच्या 3400 झाडे, चिकूची 80 झाडे, मोसंबीची 2500 झाडे आहे. येणाऱ्या 200 संत्रा झाडाला जवळपास 200 टन संत्रा असून पाणीपुरवठा करता तीन विहिरी, तीन बोरवेल आहेत. परंतु संत्रा फळ पिकाच्या उत्तमरीत्या सुव्यवस्थापन करून पुणे येथे हे ग्राहकांना थेट विक्री करतात. संत्रा पिक लागवड विषयी श्री भीमराव कडू यांची सुव्यवस्था कशी करायची. असा संदेश शेतकरी बांधवांना दिला.
संत्रा फळपीक लागवड व व्यवस्थापन
निचरा असलेली जमीन तपासून व माती परीक्षण करून चांगला खात्रीच्या रोपांची शासकीय किंवा खाजगी रोपवाटिकेतून खरेदी करावी. नवीन जागेवरती लागवड विशेष फायद्याची असते. प्रथमतः जमिनीची मशागत करून उत्तर दक्षिण 10 फूट पूर्व पश्चिम 20 फुट अशा अंतरावर खड्डे करून वरील माती व कंपोस्ट खत टाकून, खड्डे भरून घ्यावे. त्याचप्रमाणे पावसाळा सुरू झाल्यावर परिपक्व कलमांची लागवड करावी. जर अडचण आल्यास रब्बीमध्ये पण लागवड करता येते. ती सुद्धा शेतकऱ्यांना फायद्याची असते.
पाणी व्यवस्थापन विषयी बोलायचं झाल्यास पाणी व्यवस्थापन करताना ठिंबक सिंचन असल्या शिवाय लागवड करू नये. कारण पाण्याची पातळी ही दिवशी ते दिवस खोल जात आहे पाण्याची कमतरता भासत आहे म्हणून कमी पाण्यात जास्त उपयोग करून झाडाला नियोजन बद्ध पाणी देता येते. त्यामुळे झाडांना डिंक किंवा मूळ कुजण्याची शक्यता कमी असते. ठिंबकमुळे अंतर मशागत करता द्रवरुपात खतांची मात्रा देता येते. त्यामध्ये मजुरी वाचून कमी खर्चात व्यवस्थापन करता येते. त्याचप्रमाणे झाडाच्या छाटणी विषयी बोलायचं झाल्यास, एक वर्षापासून तीन वर्षापर्यंत जमिनीपासून एक फुट उंच सोडून बाकीच्या फांद्या होईल अशा पद्धतीने दरवर्षी छाटणी करणे भाग पडते. त्यामुळे झाड हे उभाट न वाढता झाडांच्या आकारमान व पानांची संख्या वाढेल व त्यामुळे उत्पादनात सुद्धा वाढ होईल. झाडाला बेगणीची गरज सुद्धा भासणार नाही. अशा तऱ्हेने एकाग्र चित्ताने बाग तयार केल्यास पाच ते सहा वर्षात हेक्टरी 30 टन उत्पादन शेतकऱ्यास घेता येते.
विक्री व्यवस्थापन याविषयी बोलायचं झाल्यास उत्पादन जरी जास्त झाले तर मालाला भाव कमी असते परंतु स्वतः विक्री करायची तयारी असली तरच कुठल्याही परिस्थितीत तोटा होणार नाही. कारण बागाची लागवड जास्त होत आहे. संत्रा जास्त पिकत आहे म्हणून स्वतःच विक्रीची जबाबदारी घ्यावी. ग्राहकास थेट विक्री करावी. तरच संत्रा शेती फायद्याची आहे. हा संदेश माझा व शेतकरी बांधवांना घेता येईल. यांच्या शेती स्थळी तालुका कृषी अधिकारी प्रकाश वसु साहेब व कृषी सहाय्यक अधिकारी यांनी भेट दिली असता अनेक शेतकरी हजर होते व यांच्या योग्य मार्गदर्शनाचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला असल्याची माहिती भिमरावजी कडू यांनी महाराष्ट्र संदेश न्यूजचे विदर्भ ब्यूरो चीफ युवराज मेश्राम यांना देण्यात आली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348