कोरपना तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपना:- शहरात व आजुबाजूच्या परिसरात मुरूम माफियांनी धुडघूस घातला असून मुरूम उत्खननाचा सपाटा चालविला आहे. येथून हजारो ब्रास मुरूमचे बेकायदेशीरपणे उत्खनन होऊनही महसूल कर्मचारी धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत. यामुळे मुरूम चोरीला आळा बसण्याऐवजी मुरूम उत्खनन व्यवसायाला गती आल्याचे दिसून येत असल्याने याला पाठबळ महसूल विभागाचे असल्याचा कोरपना ग्रामस्थांचा आरोप आहे.
कोरपना गावात माती, मुरूम चोरीचेही प्रस्थ वाढत सर्वत्र पहावयास मिळत आहे. शेतीचे उत्खनन करण्याच्या नावावर माती-मुरूमची बेकायदेशीर रित्या तस्करी बिनधास्त सुरू आहे. राजरोसपणे जेसीबी, पोकलॅन्ड मशीनच्या साहाय्याने गावा लगतच्या नाल्यातून व जमीन खोदून मुरूम लंपास केला जातो. हा सगळा प्रकार इतका सराईतपणे होत आहे की, कुणालाच कायद्याची किंवा कारवाईची भीती वाटत नाही. याच्या पाठीमागे काय गौडबंगाल आहे, याचं गणित सामान्य माणसाला उलगडत नाही. हजारो ब्रास मुरुम काढण्याच्या अनुचित प्रकाराने शासनाला लाखो रुपयांचा चुना लावल्या जात आहे. महसूल प्रशासनाने उत्खनन याची चौकशी करून कारवाई केल्यास मोठे घबाड उघडे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोरपना शहरात व लगतच्या गावातील परिसरात अवैध मुरूमचे उत्खनन होत आहे. संबंधित व्यावसायिकांनी खनिकर्म व तालुका प्रशासनाची डोळेझाक करत बेकायदेशीररित्या केलेल्या उत्खननामुळे शासनाच्या महसुलाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून याकडे कुणाचेही लक्ष नाही. प्रशासनातील संबंधित अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्यात व्यस्त आहेत. परिणामी रात्रंदिवस बेधडकपणे मुरूमची वाहतूक होत असून स्थानिक जबाबदार महसूल प्रशासनाने डोळेझाक केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348