सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर,दि.9 ऑगस्ट:- सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावात नदीवर पूल नसल्यामुळे पुराच्या पाण्यातून ग्रामस्थांना मृतकाची अंतयात्रा काढावी लागली आहे. त्यामुळे सर्वीकडे प्रशासना विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आज नेते मंडळी सांगतात भारत प्रगती पथावर आहे. पण आज कित्येक गावात शाळा, आरोग्य सेवा, रस्त्ये, पिण्याचे पाणी सर्वच नागरी सुविधेचा बोजबारा आहे. आता मेलेल्या माणसाची अशी अवस्था पाहून आपण युगात जगत आहोत हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. जेथे मृतदेहाला अंतिम संस्कार करण्यासाठी अतोनात त्रास सहन करावा लागत असेल तर विकास आहे तरी कुठे?
मरणानंतरही यातना संपेना. स्वातंत्र्याच्या 75 वा अमृतमहोत्सवी वर्षात अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावाजवळून जाणाऱ्या हरणा नदीतील विदारक दृश्य समोर आले आहे. अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावाची स्मशानभूमी हरणा नदीच्या पलीकडे आहे. सध्या राज्यात धो धो पाऊस बरसत असल्याने नदी नाले ओसोंडून वाहत आहे. हरणा नदीला पूर आला. या नदीवर पूल नसल्यामुळे ग्रामस्थांनी थेट नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा नेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार केला.
हरणा नदीवर पूल नसल्याने नागरिकांना अंत्यविधीसाठी अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला. मरणानंतरही खडतर प्रवास करण्याची वेळ आल्याचा प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, हरणा नदीवर पूल बांधण्यात यावा, यासाठी अनेक वर्षांपासून या पुलासंदर्भात ग्रामस्थांनी मागणी केली आहे. मात्र, तरीसुद्धा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. आता मृतदेह पाण्यात घेऊन जाण्याची वेळ आली, त्यामुळे आतातरी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.