✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जील्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. रेती तस्कर मोठ्या प्रमाणात सक्रिय असून आज हिंगणघाट येथे नायब तहसीलदारांवर रेती माफियांनी हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे हिंगणघाट तालुक्यात रेती तस्कर आता अधिकाऱ्याच्या जीवावर उठले असल्याचे तरी या घटनेवरून समोर येत आहे. सध्या वर्धा जिल्ह्याच्या रेती घाटांचे लिलाव झाले नाही त्यामुळे हे रेती तस्कर मोठ्या प्रमाणात अवैध रित्या नदीपात्रातून रेतीचे उत्खनन करून वाहतूक करत आहेत. त्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडत आहे.
मागील काही वर्षात रेती तस्करानी अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. आज हिंगणघाट येथील डंकीन घाटावर अशीच एक घटना समोर आली आहे. डंकीन घाटावर अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून तस्करी करण्यात येत असल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या
माहितीच्या आधारे हिंगणघाट येथील नायब तहसीलदारांसह पथकाने या ठिकाणी धाड टाकली असता पाच रेतीचे टॅक्टर रेती चोरत असल्याचे निदर्शनास आले. ही कारवाई सुरु असतानाच रेती माफियांनी नायब तहसीलदारांसह पथकावर हल्ला चढवत वाहने तेथून पळवून नेली. या प्रकरणी दगडाने हल्ला करत धक्काबुक्की आणि मारहाण करणाऱ्या रेतीमाफियांवर विविध कलमान्वये हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगणघाट येथील नायब तहसीलदार विजय पवार यांनी पथकासह डंकीन रेतीघाटावर धाड टाकली होती. तेथे पाच ट्रॅक्टर हे अवैधरित्या रेती चोरून नेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावर कारवाई सुरु असतानाच घटनास्थळावर दुचाकीने जावेद कुरेशी आणि त्याच्यामागे चार इसम धावत आले. कुरेशी याने टॅक्टर चालकांना तुम्ही टॅक्टर घेऊन जा काय आहे ते आम्ही पाहून घेतो, असं म्हणत नायब तहसीलदारसह पथकावर माफियांनी दगड फिरकावला. मात्र अधिकारी यात थो़डक्यात बचावले. रेती माफिया तेथून वाहने पळवून नेत असताना अधिकाऱ्यांनी विरोध केला. यामुळे संतापलेल्या ट्रॅक्टर चालकांसह जावेद कुरेशी आणि चार इसमानी नायब तहसीलदारसह पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करत तलाठी संजीव अंबादे यांना मारहाण केली आणि वाहने तेथून पळवून नेली. टॅक्टर पळून जात असल्याचे पथकाने मोबाईलमध्ये चित्रीकरण सुद्धा केले आहे.
घटनेनंतर महसूल विभागाच्या पथकने हिंगणघाट पोलीस ठाण्यात पाच टॅक्टर चालकासह जावेद कुरेशी आणि अनोळखी तीन ते चार इसमा विरोधात हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी शासकीय कामात अडथळा करत दगडफेक आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहेत.

