विश्वास त्रिभुवन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाइन अहमदनगर:-.आज लाचखोरोच्या भयंकर साप समाजात विष पसरवत आहे. या लाचखोरीत महिला अधिकारी पण मागे नाही अशीच एक खळबजनक बातमी समोर आली आहे. एका लाचखोर महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच घेतल्या प्रकरणी अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण आरोग्य विभागात एकच खळबळ माजली आहे.
कामाचा मोबदला आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी साडेचार हजार रुपये लाच घेतल्यानंतर पण लाचेचा भस्म्या रोग जळलेल्या एका महिला वैद्यकीय अधिकारी हिने पुन्हा 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. वारंवार लाचेची मागणी करत असल्याने तक्रारदराने याची तक्रार अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली त्यामुळे राहुरी तालुक्यातील बारागांव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.
वैद्यकिय अधिकारी डॉ. वृषाली तुळशीराम सूर्यवंशी-कोरडे वय-39 असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. अहमदनगर एसीबीने ही कारवाई बुधवारी (दि.8) प्राथमिक आरोग्य केंद्र बारागांव नांदूर येथे आरोपीच्या केबीन मध्ये करण्यात आली.
याबाबत राहुरी येथील समुदाय आरोग्य अधिकारी महिलेने वय-26) अहमदनगर एसीबीकडे मंगळवारी (दि.6) केली होती. तक्रारदार या समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नोकरीस असुन, त्यांचा ऑगस्ट व सप्टेंबर 2021 या दोन महिन्यांचा कामावर आधारित मोबदला व प्रोत्साहन भत्ता व ऑक्टोबर महिन्याचा प्रोत्साहन भत्ता मिळणे करिता तक्रारदार यांनी वैद्यकिय अधिकारी डॉ. वृषाली सूर्यवंशी-कोरडे यांची दोन महिन्यांपूर्वी भेट घेऊन विचारणा केली. त्यावेळी त्यांनी तुला मिळणारे रक्कमेच्या निम्मी रक्कम द्यावी लागेल असे सांगितले.
त्यानंतर मागील एक महिन्यापूर्वी तक्रारदार या पुन्हा आरोपी डॉ. वृषाली सूर्यवंशी-कोरडे यांना भेटल्या. त्यावेळी त्यांनी आता काहीतरी रक्कम दे तरच मी तुझे बिलासंबधी पुढील प्रोसेस करेन असे सांगितले. तक्रारदार यांनी नाईलाजाने जवळ असलेले साडेचार हजार रुपये त्यांना दिले. त्यानंतर 3 फेब्रुवारी रोजी तक्रारदार यांनी पुन्हा आरोपी डॉ. वृषाली सूर्यवंशी-कोरडे यांची भेट घेऊन बिलासंदर्भात विचारणा केली. आरोपीने पुन्हा बिलाचे निम्म्ये रकमेची मागणी केली व तडजोड अंती 10 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले.
तक्रारदार यांना आरोपी डॉ. वृषाली सूर्यवंशी-कोरडे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार मंगळवारी पंचासमक्ष केलेल्या पडताळणी मध्ये आरोपी डॉ. वृषाली सूर्यवंशी-कोरडे यांनी तक्रारदार यांचेकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्र बारागांव नांदूर येथे लाचेचा सापळा रचला. आरोपी डॉ. वृषाली सूर्यवंशी-कोरडे यांनी त्यांचे केबीन मध्ये तक्रारदार यांचे कडुन 10 हजार रुपये लाच स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एसीबी पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर, पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के, चालक पोलीस हवालदार हरुन शेख यांच्या पथकाने केली.