✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा, न, 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- शिष्यवृत्ती परीक्षेस इयत्ता पाचवी व आठवी करिता प्रविष्ट विद्यार्थ्यांचा चांगला सराव व्हावा या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळांमध्ये अभिरुप पद्धतीने सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परिक्षेस विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग लाभला.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इयत्ता पाचवीतील 3 हजार 126 व इयत्ता आठवीतील 749 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. जिल्हा परिषद शाळांतील एकही विद्यार्थी स्कॉलशीपच्या परिक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व विद्यार्थ्यांना परिक्षेस बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या सर्व विद्यार्थ्यांची फी भरण्याची व्यवथा सेसफंडातून करण्यात आली.
जिल्हास्तरावरून ओएमआर उत्तरपत्रिका देण्यात आल्या व शाळास्तरावरून प्रश्नपत्रिका सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या. सदर सराव परीक्षेचे आयोजन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले. सीईओ रोहन घुगे यांनी या परिक्षेला प्राथमिक शाळा, कुरझडी जामठा येथे भेट दिली. भेटीच्या वेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मंगेश घोगरे, गटशिक्षणाधिकारी डॉ.धर्मपाल कुमरे उपस्थित होते.
या भेटीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून स्पर्धा परीक्षेचे महत्व व पेपर सोडविण्याची पध्दत अत्यंत सोप्या भाषेत पटवून सांगितली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत होणाऱ्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेकरिता सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यातील सर्व पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन व नियोजनाकरिता प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यासह गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, शिक्षक, कर्मचारी व शिक्षक संघटनांनी घेतलेल्या उत्कृष्ट पुढाकाराबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी त्यांचे कौतूक केले.