संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- वेकोली बल्लारपूर क्षेत्रा अंतर्गत सास्ती – राजुरा आणि सास्ती – बल्लारपूर मार्गावर राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध्य पद्धतीने कोळसाची जडवाहतूक करणाऱ्या ट्रकांना अडवून लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आक्रमक पवित्रा घेत चक्काजाम आंदोलन केले. स्वतः आमदार धोटे यांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी व पोलीस निरीक्षक राजुरा यांना संपर्क साधून वाहतूक पोलीसांना घटनास्थळी बोलावून कोळसाच्या १५ ओव्हरलोड ट्रक वरती ताबडतोब कार्यवाही करायला लावले व याव्यतिरिक्त अन्य सर्व ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
या प्रसंगी उपस्थित पत्रकार व नागरीकांसमोर आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की सास्ती ते राजुरा रस्त्यासाठी राज्य शासनाकडून ५ कोटी रुपये मंजूर केले होते. काही दिवसांपूर्वी कामाला सुरुवात झाली परंतु क्षमतेपेक्षा जास्त जडवाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे. त्यामुळे ठेकेदार सुद्धा हा रस्ता तयार करतांना गोंधळलेल्या अवस्थेत होते. मंजूर निधी पैकी बराच निधी खड्डे बुजविण्यात खर्च आले. कामाला विलंब होत झाला. वाढिव निधी मंजूर करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागले. अशा परिस्थितीत अतिरिक्त मागणी करून पुन्हा निधी मंजूर केला. आता पुन्हा रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांकडून दिवसाढवळ्या राजरोसपणे अवैध पद्धतीने क्षमतेपेक्षा जास्त कोळशाची वाहतूक होत असल्यामुळे हा रस्ता टिकेल कसा हा प्रश्न उपस्थित केला. यापुढे अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक कोळसा वाहतूक खपवून घेतली जाणार नाही. असेच चित्र सुरू राहील्यास येथील जडवातूक कायमची बंद करण्यासाठी आक्रमक आंदोलन करण्यात येईल. तसेच वेकोलीने कोळसा वाहतूकीसाठी सामान्य नागरिकांच्या वापरासाठी असलेल्या रस्त्यावरून ही वाहतूक न करता पर्यायाई व्यवस्था करावी असे आवाहन केले.
ते पुढे म्हणाले की, अनेकदा या मार्गावरून ओव्हरलोड वाहतुकीमुळे कोळसा पडून अपघात होणे, धुळ प्रदूषणात वाढ होणे, रस्ते पूर्णपणे खराब होणे अशा अनेक घटना घडून येतात ज्याला कायमस्वरूपी आडा बसणे आवश्यक आहे. वेकोली कामगार व स्थानिक नागरिक यांची वारंवार मागणी आहे की वेकोली प्रशासनाने सुद्धा अवैध जड वाहतुकीला पायबंध घातला पाहिजे. वजन करणारे कर्मचारी तसेच विभागाचे अधिकारी यांना तंबी देऊन कडक कारवाई करण्यात यावी अशा सूचना केल्या.
या प्रसंगी उप प्रादेशिक परिवहन निरिक्षक नरेंद्रकुमार उमाडे, विशाल कसंबे, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, वाहतूक पोलीस, यासह काँग्रेसच्या विविध विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सास्ती, धोपटाळा, रामपूर परिसरातील शेकडो स्थानिक नागरिक उपस्थित होते.

