नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथील आझाद मैदान येथे केंद्रीय सांस्कृतिक संचालनालयाच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सव २०२३ या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. भारतीय संस्कृतीचा अनमोल वारसा जपण्यासाठी हा महोत्सव मुंबईत ११ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना एक लाखांपेक्षा जास्त कार्यक्रम देशात आणि विदेशात आयोजित केले जात आहेत. हा केवळ सरकारी कार्यक्रम नसून भारतीय नागरिकांचा कार्यक्रम असल्याचे मत याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाने संस्कृती आणि कलेला नेहमी प्रोत्साहन दिलेले आहे. नुकतेच जय जय महाराष्ट्र या गीताला राज्य गीत म्हणून सन्मानित केलेले आहे. पर्यटनवाढीस चालना देणारे उपक्रम राज्यात सुरू आहेत. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन देखील केले आहे. कला ही अशी गोष्ट आहे की जी सर्व लोकांना एकत्र जोडते त्यामुळे या महोत्सवाच्या माध्यमातून अनेक कला नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू असा निर्धार यासमयी बोलताना व्यक्त केला.
याप्रसंगी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित उपस्थित होते.