नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- शहरात ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानातंर्गत सौंदर्यीकरण, सुशोभिकरण, स्वच्छता, शौचालयांची स्वच्छता महापालिका कार्यक्षेत्रात दैनंदिन सुरू असून हा बदलही नागरिकांना दिसू लागला आहे. तसेच ठाणे स्टेशन आवारातील 150 मीटर परिसरातील फेरीवाले हटविल्यामुळे पदपथ मोकळे झाले आहे. दैनंदिन स्वच्छतेबरोबर आज ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात पूर्व व पश्चिम बाजूस ठाणे महापालिका व विविध संस्थांच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानातंर्गत् ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023 विशेष स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. या मोहिमेतंर्गत परिसर अस्वच्छ करणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या व प्लॅस्टिचा पिशव्यांचा साठा करणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई करुन एकूण 22 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका व विविध अशासकीय संस्थांच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत आज विशेष स्वच्छता मोहिम आज (12 फेब्रुवारी) सकाळी 7 वाजल्यापासून स्टेशन परिसरातील सॅटिस पूल, ठाणे पूर्व व पश्चिम परिसरात राबविण्यात आली. यात ठाणे महापालिकेतील घनकचरा विभाग, रोटरी क्लबच्या विविध शाखा, सेंट्रल रेल्वे, अशासकीय संस्था, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी झाल्या होत्या.
यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, घनकचरा विभागाचे उपायुक्त तुषार पवार, आरोग्य अधिकारी बालाजी हळदेकर, ठाणे रेल्वेस्टेशनचे उपप्रबंधक रविश कुमार, आरोग्य अधिकारी तथा नोडल अधिकारी श्री. हाळवेकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री. दांडेकर उपस्थित होते. न्यूज फाऊंडेशनचे निशांत बंगेरा, रोटरीचे ललीत मणिक आदी उपस्थित होते. तसेच उपस्थित राहून स्वत्: या मोहिमेत सहभागी घेवून रस्त्यांची साफसफाई केली.
या मोहिमेत सॅटिस पुल, दादा पाटीलवाडी, कोपरी पूर्व स्टेशन परिसरातील भिंतीवर चिटकविण्यात आलेली जाहिरांतीची भित्तीपत्रके काढण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी भित्तिपत्रकांमुळे विद्रुपीकरण झाले होते, सदरचा परिसर पाण्याच्या सहाय्याने स्वच्छ करण्यात आला. तसेच ज्या दुकांनासमोर अस्वच्छता आढळून आली असे दुकानदार व पानटपरीधारक तसेच प्लॅस्टिकचा साठा करणारे दुकानदार अशा एकूण 160 दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करुन एकूण 22,700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर स्वच्छ करुन करण्यात तसेच यावेळी स्वच्छतेची शपथ नागरिकांना देण्यात आली.
या विशेष मोहिमेत ठाणे महापालिकेचे सर्व स्वच्छता निरीक्षक, उपमुख्यस्वच्छता निरीक्षक, तसेच 300 हून अधिक सफाई कर्मचारी सहभागी झाले होते. या अभियानात सहभागी होवून शहर स्वच्छतेसाठी आपले योगदान देणारे सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांचा सत्कार अतिरिक्त् आयुक्त् 2 संजय हेरवाडे, उपायुक्त तुषार पवार यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच ठाणे शहराची दैनंदिन स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांची यावेळी मोफत आरोग्यतपासणी करण्यात आली.
ठाणे रेल्वेस्टेशन परिसर स्वच्छ झाल्यामुळे नागरिकांनी यावेळी उपस्थित महापालिका अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त् केले. तसेच दैनंदिन परिसराची स्वच्छता ही महापालिकेच्यावतीने होतच असते, परंतु स्वच्छता ही जरी महापालिकेची जबाबदारी असली तरी प्रत्येक नागरिकांनी याचे पालन केल्यास परिसर स्वच्छ राहण्यास निश्चितच मदत होणार आहे यासाठी नागरिकांनी देखील महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.