सगळे वातावरण झाले भगवे ; आमदार प्रताप सरनाईक यांची वचनपूर्ती
अभूतपूर्व जल्लोषात झाली भगव्या ध्वजाची दिमाखदार प्रतिष्ठापणा ; भव्य मिरवणुकीला हजारो शिवप्रेमींची उपस्थिती
नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतीनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भाईंदर :- शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आज घोडबंदर किल्ल्याच्या बुरुजावर १०५ फूट उंच हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असलेला सगळ्यात मोठा भगवा ध्वज डौलाने फडकला आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज कि जय’, ‘हर हर महादेव’ असा जयघोष दुमदुमला. हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत आधी ध्वजपूजन यात्रा काढून , मंत्रोचारात पुरोहितांकडून ध्वजाची पूजा करून या भगव्या ध्वजाची बुरुजावर स्थापना करण्यात आली. २४ तास दिवस रात्र हा ध्वज येथे फडकणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर उभा राहिलेला महाराष्ट्रातील हा पहिला भगवा ध्वज स्थापन करण्याची ही घटना ऐतिहासिक असल्याचे मत सर्व मान्यवरांनी व्यक्त केले. घोडबंदर किल्ल्याप्रमाणेच राज्यातील इतर गड – किल्ल्यांच्या संवर्धनासाठीही यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आपण अधिवेशनात सरकारकडे आग्रह धरू , असे यावेळी आमदार सरनाईक यांनी जाहीर केले.
घोडबंदर किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व ओळखून आमदार सरनाईक यांनी या किल्ला परिसराला नवी ओळख देण्याचा संकल्प केला आणि त्यासाठी पुरातत्व विभाग , महाराष्ट्र सरकार सगळीकडे सतत पाठपुरावा केला. एकेकाळी पूर्णपणे दुर्लक्षित झालेल्या घोडबंदर किल्ल्याचे रूप आता पूर्णपणे पालटले आहे. कारण आमदार सरनाईक यांनी जिद्दीने पुरातत्व विभागाच्या नियमाच्या चौकटीत राहून , कोणत्याही जुन्या बांधकामाला धक्का न लावता किल्ल्याचे संवर्धन , जतन करण्याचे काम पूर्ण करून घेतले आहे. आता किल्ल्याच्या बुरुजावर भगवा ध्वज कायमस्वरूपी स्थापन करण्याचे आमदार सरनाईक यांनी ठरवले होते व ते प्रत्यक्षात आणले देखील. ध्वज स्थापनेचा आजचा सोहळा संस्मरणीय झाला.
आज १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणजेच शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर भव्य ध्वज प्रतिष्ठापना सोहळा हजारो शिवभक्त , स्थानिक ग्रामस्थ , मीरा भाईंदरकर नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. बुरुजावर १०५ फूट उंच ध्वजस्तंभ आहे. तर भगवा ध्वज २० फूट उंच व ३० फूट लांब ध्वज आहे. हा ध्वज २४ तास फडकत राहील. विशेष म्हणजे हा ध्वज रात्रीही दिसावा यासाठी आकर्षक अशी विद्युत व्यवस्था ध्वजाच्या दिशेने करण्यात आली आहे. आज रिमोटच्या साहाय्याने १०५ फूट उंच ध्वज स्तंभावरून ध्वज वर गेला आणि आकाशात ध्वज डौलाने फडकला. आमदार प्रताप सरनाईक , ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे , पोलिस आयुक्त मधुकर पांडे , आयुक्त दिलिप ढोले यांच्या शुभहस्ते हा भगवा ध्वज रिमोटचे बटन दाबून ध्वज स्तंभावर आकाशात उंच फडकला. ज्यांच्या संकल्पनेतून हा भगवा ध्वज उभा राहिला त्या आमदार प्रताप सरनाईक यांचा शिवप्रेमींकडून सत्कार करण्यात आला. ११ पुरोहितांनी विधिवत ध्वजाचे पूजन केले. या ध्वज स्थापनेसाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी आमदार निधीतून ५० लाखांचा आमदार निधी दिला होता.
ध्वज पूजन यात्रा, भव्य मिरवणूक
सकाळी घोडबंदर गावातील श्री दत्त मंदिरापासून ढोलताशाच्या गजरात , तुतारीच्या निनादात ‘ध्वज पूजन यात्रा’ निघाली. झांज पथक , लेझीम पथक , ढोलताशांचा गजर आणि तुतारीचा निनाद करत भव्य यात्रा निघाली. सकाळी गावातील तरुणांची बाईक रॅलीही निघाली. भगवे फेटे आणि टोप्यांनी वातावरण भगवे झाले होते. स्थानिक महिला व शिवसेना महिला आघाडीने डोक्यावर मंगल कलश घेऊन ‘कलश यात्रा’ काढली. सगळे वातावरण भगवे आणि शिवमय झाले होते. गावातून ही ध्वज पूजन यात्रा निघाली. श्री दत्त मंदिरात ध्वजाचे पूजन करून पालखीतून भगवा ध्वज किल्ल्यात आणला गेला. स्वतः आमदार सरनाईक यांनी पालखी खांद्यावर घेतली. यावेळी घोडबंदर गावातील ग्रामस्थ , दुर्ग व शिवप्रेमी मोठ्या संख्येने आज घोडबंदर किल्ल्यावरील भगव्या ध्वजाला मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते. महिला , लहान मुले – मुली यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. तर छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेले तरुण , मावळे घोड्यावर स्वार होऊन आले होते तसेच इतरही महापुरुषांच्या वेशभूषा लहान मुलांनी केल्या होत्या.
मनपा आयुक्त ढोले म्हणाले की , आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी व संकल्पनेतून घोडबंदर किल्ल्याला नवीन रूप आले आहे. किल्ल्याच्या जतन , संवर्धन व डागडुजीसाठी आतापर्यंत १३ कोटी खर्च झाला आहे. किल्ल्यावर फडकलेला इतका भव्य महाराष्ट्रातील हा पहिला ध्वज आहे.हे मीरा भाईंदर शहराचे भाग्य आहे असेही आयुक्त म्हणाले. तर जिल्हाधिकारी म्हणाले की , आजचा हा सगळ्यात मोठा ध्वज आपल्या जिल्ह्यातील घोडबंदर किल्ल्यावर फडकत आहे ही ऐतिहासिक घटना आहे. सर्वांचे कल्याण आणि विकास करण्याची प्रेरणा या ध्वजाकडे पाहून आम्हाला मिळेल. आमदार सरनाईक यांच्या संकल्पनेतून येथे शिवसृष्टीही उभी राहत असल्याने या परिसराला एक विशेष महत्व नजीकच्या काळात प्राप्त होईल , असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
ध्वजाची घेतली जाणार पूर्ण काळजी !
हा आपल्या स्वराज्याचा भगवा ध्वज २४ तास किल्ल्यावर फडकेल. मीरा भाईंदर शहराच्या वेगवेगळ्या भागातूनच न्हवे तर आसपासच्या शहरातूनही हा फडकत असलेला ध्वज दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत व आदर्श आहेत. महाराजांच्या आदर्शांना डोळ्यासमोर ठेऊन आपण जनसेवा करीत आहोत. हा भगवा ध्वज आकाशात फडकेल आणि आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची नेहमीच आठवण करून देत राहील व त्यातून प्रत्येकाला प्रेरणा मिळत राहील. सगळ्यांना आपल्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देणारा , स्फूर्ती आणि प्रेरणा, ऊर्जा देणारा भव्य-दिव्य असा हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज आज डौलाने फडकला हा माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण आहे , असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तर घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून मोकळ्या जागेत गार्डनिंग , किल्ल्यातील हौदात म्यूजिकल फाउंटन , लाईट अँड साउंड शो अशी बरीच कामे अजून होणार असून त्या सुशोभीकरणाचे लोकार्पण १ मे रोजीच्या दिवशी होईल व त्याच दिवशी शिवसृष्टीचे भूमिपूजन मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येईल , अशी घोषणा सुद्धा आमदार प्रताप सरनाईक यांनी आज केली.
ध्वज स्तंभावर २४ तास फडकणारा ध्वज दर १ महिन्याने बदलला जाईल. कारण वारा , धूळ किंवा इतर कारणाने फडकणाऱ्या ध्वजाला काही झाल्यास दर महिन्याने तो ध्वज सन्मानाने खाली उतरवून त्याजागी धुतलेला दुसरा ध्वज फडकवला जाईल. असे एकूण ७ मोठे ध्वज उपलब्ध करून ठेवण्यात आले आहेत. म्हणजे पूर्णपणे नियोजन करून ध्वजाची पूर्ण काळजी घेतली जाईल , असेही सांगण्यात आले. याबाबतच्या सूचना आमदार सरनाईक यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.