सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- रोटरी क्लब ऑफ बल्लारपूर व रोट्रॅक्ट क्लब बल्लारपूरच्या वतीने दि.19 फेब्रुवारी 2023 ला बल्लारपूर तालुक्यातील कवडजई येथे ‘जैविक शेती एकदिवसीय कार्यशाळा’ घेण्यात आली. दर्जेदार पिक उत्पादनासाठी जमिनीचे आरोग्य व जैविक शेती याविषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मंचावर गजानन पवार, संचालक स्वराज्य ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड धामणगाव रेल्वे, अमरावती हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच प्रफुल चरपे अध्यक्ष रोटरी बल्लारपूर, नितीन येल्लोरे सरपंच कवडजई, चेतन पटेल अध्यक्ष रोट्रॅक्ट बल्लारपूर, महादेव मडावी उपसरपंच कवडजई, रुपेश जुवारे,राहुल आत्राम सदस्य ग्रा.प.कवडजई अजय तोटावार, अरुण उपरे राघो गेडाम,बंडू बोबाटे सामाजिक कार्यकर्ते कवडजई यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ‘कॄषि विकास हाच रोटरीचा ध्यास’ अंतर्गत शेतकरी, महिला बचत गट व ग्रामीण युवकांना वर्षभर विविध विषयांवर प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्याचा प्रकल्प रोटरिद्वारे सुरु करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. रासायनिक खतांच्या असमतोल वापरामुळे जमीनीतिल जैविक विविधतेवर परिणाम होऊन जमीनीचे आरोग्य बिघड़त आहे. याचा परिणाम पिक उत्पादन व दर्जा यावर होत आहे शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करून उत्पादन कमी होत आहे. शेतकऱ्यांनी माती परीक्षणानुसार पिकाला अन्न द्रव्याचा पुरवठा करावा.खतांचे प्रकार याबाबत माहिती दिली तसेच सेंद्रिय व जैविक खतांचा वापर वाढवावा असे आवाहन मान .गजानन पवार यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनातून केले. यावेळी मान. नितीन येल्लोरे सरपंच यांनीही जैविक शेतीचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व रोटरी व रोट्रॅक्ट क्लब सदस्यांचे सहकार्य लाभले.
कार्यशाळेचे सुत्रसंचालन रोटरीयन निलेश चिमड्यालवार यांनी केले. रोटरी बल्लारपूर चे सचिव महेश कायरकर यांनी आभार मानले.