कोरोनाच्या २ वर्षांची रक्कम माफीबाबत निर्णय घेण्यात यावा.
सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर २१ फेब्रुवारी:- गोल बाजार येथील गाळेभाड्यात अचानक केलेली वाढ गाळेधारकांना अन्यायकारक वाटत आहे.ऑनलाईन मार्केटमुळे अनेक व्यापारी अडचणीत आहेत तसेच कोरोना काळामुळेही व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे तेव्हा महानगरपालिकेने भाडेवाढीबाबत सारासार विचार करून निर्णय घेण्याचे निर्देश खासदार बाळुभाऊ धानोरकर यांनी दिले.
१९९१ मध्ये महानगरपालिका व गोल बाजार येथील गाळेधारक यांच्यात झालेल्या करारानुसार गाळेभाड्यात दर ३ वर्षांनी १५ टक्के वाढ अपेक्षीत असतांना रेडीरेकनरच्या दरानुसार २०१२ मध्ये भाड्याची आकारणी मनपातर्फे करण्यात आली.भाडेवाढ गाळेधारकांना अन्यायकारक वाटल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. भाडेवाढ कमी करण्यासंबंधी गोल बाजार येथील गाळेधारकांनी जे निवेदन दिले आहे त्यावर सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्यात यावा. ऑनलाईन मार्केटमुळे अनेक व्यापारी अडचणीत आहेत तसेच कोरोना काळामुळेही व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे तेव्हा सारासार विचार करून महानगरपालिकेने भाडेवाढीबाबत निर्णय घेण्याचे तसेच कोरोनाच्या २ वर्षांची रक्कम माफ करण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश खासदार बाळुभाऊ धानोरकर यांनी महानगरपालिका येथे आयोजीत आढावा बैठकीत दिले.
मनपाच्या उत्पन्नाचे स्रोत मर्यादीत असल्याने नागरीकांनीही कर नियमित भरावा. वारसान साठी असलेले हस्तांतरण शुल्क सुद्धा कमी करण्यात यावे. दुकान गाळेधारकांसाठी भाडे व इतर शुल्काचा भरणा नियमित व्हावा या दृष्टीने मनपातर्फे NASH प्रणाली सुरु करण्यात आली असुन नियमित कर भरणा करणाऱ्या गाळेधारकांना रेंटमध्ये ५ टक्के सुट मिळणार आहे.सदर योजना चांगली असुन गाळेधारकांनी याचा फायदा घ्यावा व भाडे व इतर शुल्काचा भरणा नियमित करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.
मनपा व गाळेधारक यांची समन्वय समिती नेमण्यात यावी तसेच गाळेधारकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पार्किंगची सुविधा या मुलभूत सुविधा मिळतील याची काळजी घ्यावी. बाबुपेठ येथील अटलबिहारी वाजपेयी पार्क येथील देखभाल दुरुस्ती बरोबर नसल्याच्या तक्रारी आहेत तेव्हा तेथील ठेकेदाराला सुचना देण्यात याव्या. नगिनाबाग येथील सावित्रीबाई फुले सभागृह येथे विनापरवानगी कार्यक्रम घेण्यात येतात. प्रशासनाने दखल घेऊन सभागृह सर्वांना उपलब्ध राहील याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी याप्रसंगी दिले.
याप्रसंगी वरोरा येथील आमदार प्रतिभा धानोरकर,आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे,काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, माजी महापौर संगीता अमृतकर, माजी नगरसेविका सुनीता लोढीया तसेच इतर अधिकारी उपस्थीत होते.