अक्षय जाधव सातारा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन सातारा :- दि-19 – इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वाई – येथील बेल एअर हॉस्पिटलचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, सिने अभिनेता आमिर खान, चेअरमन होमी आर उसरुखान, मेडीकल सुपरिटेंडंट प्रेमजीशेठ, पुरुषोत्तम जाधव, फादर टॉमी करियलकुलम, प्रातांधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसिलदार रणजित भोसले, राजेंद्र राजपुरे यांच्यासह संस्थेतील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खासदार श्री. पाटील म्हणाले, वाई येथे नव्याने सुरू होणाऱ्या बेल एअर हॉस्पिटल मुळे वाई व महाबळेश्वर या डोंगरी तालुक्यातील नागरिकांना अत्याधुनिक अशी आरोग्य सेवा मिळणार आहे. बेल एअर हॉस्पिटल महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम अशा ठिकाणी जाऊन आरोग्य सेवा देत आहे.
इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे आरोग्य क्षेत्रातील काम खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. या पुढील काळातही बेल एअर हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मोफत चांगले उपचार देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमदार मकरंद पाटील म्हणाले, इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे पाचगणी येथील बेल एअर हॉस्पिटलमध्ये टीबी, एच आय व्ही यासारख्या आजारांवर चांगल्या प्रकारे उपचार करीत आहे. त्याचबरोबर महाबळेश्वर व वाई तालुक्यातील दुर्गम भागातही आरोग्य सुविधा देत आहे. कोरोना महामारीच्या काळात अत्यंत चांगल्या पद्धतीने हॉस्पिटल ने काम केले. वाई येथे झालेल्या बेल एअर हॉस्पिटल मुळे जिल्ह्यातील तसेच महाबळेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आरोग्य सुविधा चा लाभ मिळेल असेही त्यांनी सांगितले.
विविध संस्थांच्या मदतीमधून वाई येथील बेल एअर हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना अत्याधुनिक पद्धतीने उपचार केले जाणार आहेत. बेल एअरचे आरोग्य क्षेत्रातील काम पाहता पुढेही अशाच प्रकारे काम करतील असा विश्वास जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी व्यक्त केला.
बेल एअर हॉस्पिटलचे रुग्ण सेवेचे आदर्श काम सुरू आहे. बेल एअरचे वाई येथे झालेले हॉस्पिटल हे नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल असे पोलीस अधीक्षक श्री. शेख यांनी यावेळी सांगितले.
इंडियन रेड क्रॉस सोसायटीने वाई येथे हॉस्पिटलची उभारणी करून येथील नागरिकांबरोबर पर्यटकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप मोलाचे काम केले आहे. ही आनंदाची गोष्ट असल्याचे सिने अभिनेते श्री. खान यांनी सांगितले. या उद्घाटन कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे पदाधिकारी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते…