✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगणघाट येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यास विविध कंपनीमध्ये असलेली रिक्त पदे भरण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी आपल्या कागदपत्रास मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणघाट व रा.सु. बिडकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रा.सु. बिडकर महाविद्यालय येथे दि. 29 मार्च रोजी सकाळी 10 वाजता आयोजित महारोजगार मेळाव्यात इंडोरामा सिंथेटिक प्रा.लि. बुटीबोरी, प्लॉस्टो पाईप्स, हिंगणा, गिमाटेक्स प्रा.लि. हिंगणघाट, जायका मोटर्स हिंगणा, महिंद्रा अँड महिंद्रा हिंगणा, अशोक ले-लँड, सुझकी मोटर्स गुजरात, प्यजिओ वेहीकल्स, बारामती यासारख्या नामांकित कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित राहुन त्यांच्याकडे रिक्त असलेली पदे भरण्याकरीता मुलाखती घेणार आहे.
त्याप्रमाणे या मेळाव्यामध्ये शासनाच्या इतर विविध महामंडळाचे स्टॉल उपलब्ध राहणार असून उमेदवारांना रोजगारासोबतच स्वयंरोजगाराविषयी मार्गदर्शन व योजनाविषयी माहिती देण्यात येणारआहे. तसेच रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त होण्याच्यादृष्टीने निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षणाबाबत माहिती देण्यात येणार आहे. या महारोजगार मेळाव्यात इयत्ता 10 वी, 12 वी, पदवीधर, आयटीआय इत्यादी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना सहभागी होता येईल. यासाठी उमेदवारांनी आपले सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्ड, तीन प्रती मध्ये बायोडाटा सोबत आणावा तसेच हा मेळावा ऑनलाईन सुध्दा उपलब्ध असून तरी शहरातील सर्व उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी महास्वयंम पोर्टलवर नोकरी इच्छुक टॅबवर क्लीक करुन करुन सेवायोजन कार्डवरील नोंदणी क्रमांक व पासवर्डचा वापर करुन जिल्हा निवडावा व आपल्या आवडत्या कंपनीवर अप्लाय करावा. हा ऑनलाईन रोजगार मेळावा दि.29 ते 30 मार्च पर्यंत महास्वयंम पोर्टलवर उपलब्ध असणार आहे. या महारोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने कळविण्यात आले आहे.