नितेश पत्रकार, यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन यवतमाळ:- जिल्हातील दारव्हा येथून एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. राज्य महामंडळाची बस दारव्हा येथून नागपूरकडे निघाली होती त्यात बसचा कामठवाडा येथे भीषण अपघात झाला त्यात दोन प्रवासी ठार, अनेक प्रवासी जखमी झाले आहे.
दारव्हा येथील आगाराची बस नागपूरकडे जाण्यासाठी प्रवाशी घेऊन निघाली त्या बसला दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. ही बस दारव्हा आगाराची असून दारव्हा-नागपूर (एमएच ४० वाय ५०२२) ही बस नागपूरकडे जात असताना कामठवाडा येथे समोरून येणाऱ्या मालवाहु वाहनाचे नियंत्रण सुटल्याने बसचा एका बाजूचा भाग चिरत गेला. हे मालवाहू वाहन पाईप घेऊन जात होते. या अपघातात दोन प्रवासी जागीच ठार झाल्याची माहिती आहे.
अपघात घडताच गावकऱ्यांसह मागाहून आलेल्या एसटीतील प्रवाशांनी मदतकार्य सुरू करून जखमींना बसच्या बाहेर काढले. अपघातात १० पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातातील मृत व जखमी प्रवाशांची नावे अद्याप कळली नाहीत. घटनेची माहिती मिळताच लाडखेड पोलिसांसह एसटीचे अधिकारी घटनास्थळी पोहचले.