वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथील पिपरी येथून एक खळबळजनक घटना समोर आली होती. पिंपरी चिंचवड येथील महानगर पालिका येथे कार्यरत अनुसुचित जातीच्या सफाई कर्मचारी महिलेला मारहाण करण्यात आली होती. आता या प्रकरणात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने पुणे जिल्हाधिकारी, पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्त आणि समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडून येत्या 30 दिवसांत याबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
अनुसुचित जातीच्या सफाई कर्मचारी महिलेला मारहाण प्रकरणाची राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने देखील याची गंभीर दखल घेतली असून महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना याबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल 15 दिवसांत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सफाई कामगार बबीता महेंद्र कल्याणी वय 42 वर्ष यांना आकुर्डी येथे तीन महिन्यांचा पगार मागण्यासाठी गेल्या असताना हर्षद कमाल खान याने मारहाण केली होती. हा प्रकार 21 तारखेला घडला होता. या प्रकरणी निगडी पोलिसांत फिर्याद दाखल आहे. दरम्यान, या मारहाण प्रकरणाबाबत अॅड. सागर चरण यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. त्याची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने दखल घेतली आहे.
संबंधित महिलेस तीन महिन्यांचे वेतन मिळावे. सध्या सुरू असलेले काम चालू ठेवण्यास मदत करावी. महिलेला कायद्यानुसार नुकसानभरपाई मिळावी. तसेच, याबाबत केलेल्या कारवाईची माहिती 30 दिवसांमध्ये सादर करावी, असे निर्देश पुणे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त (पुणे) यांना सादर करावे, असे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.