विक्की डोके लाखांदूर तालुका प्रतिनिधी
महराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा दि.28:- तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत 652 लोकांवर कोटपा कायदयातंर्गत कारवाई करण्यात आली असून एकुण एक लाख वीस हजार पस्तीस रूपयांचा दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयाने दिली आहे.
येणाऱ्या पिढीला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्था पासून दूर राहावी यासाठी शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी पोलीस विभाग, शिक्षण विभाग, सलाम फांऊडेशन, आरोग्य प्रबोधीनी संस्थेव्दारे जिल्हयात तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. काल जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत राबविण्यात आलेल्या बाबींचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य् चिकीत्सक डॉ. दिपचंद सोयाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद सोमकुंवर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
भंडारा जिल्हयात एकुण 1329 शाळांमध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.193 शाळा तंबाखूमुक्त झाल्या असुन या कार्यक्रमाव्दारे विदयार्थी व्यसनापासून दूर राहत आहेत. भंडारा जिल्हयातील अन्य शाळा- महाविदयालयांमध्ये पोलीस व शिक्षण विभागांनी अचानक भेटी देवून या अभियानाच्या यशस्वीता तपासण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.