मिरा भाईंदर शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी 2 “डस्ट कंट्रोल यंत्रणा” पर्यावरण विभागात दाखल
नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
8369205752
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन मिरा भाईंदर:- हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र शासनाच्या 15व्या वित्त आयोगातील निधीमधून व “राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम” (NCAP) अंतर्गत 2 “डस्ट कंट्रोल यंत्रणा” घेण्यात आल्या आहेत. सदर यंत्रणाच्या कार्यप्रणालीबाबत दिनांक 28 मार्च 2023 रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिकरित्या सादरीकरण करण्यात आले. सदर प्रसंगी माजी महापौर श्रीमती ज्योत्स्ना हसनाळे, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (पर्यावरण) संजय शिंदे, उपायुक्त (घ.क.व्य.) रवी पवार, उपायुक्त (शिक्षण) कल्पिता पिंपळे, माजी नगरसेवक, महापालिका विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मिरा भाईंदर शहर हे मुंबई शहरालगत असलेले आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेले एक स्मार्ट शहर म्हणून नावारूपास येत आहे. मिरा भाईंदर शहरात विविध विकास प्रकल्प, औद्योगिक प्रकल्पांमुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेवर त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने आयुक्त यांच्या निर्देशा नुसार महानगरपालिका पर्यावरण विभागामार्फत हवेची गुणवत्ता सुधारणा करणेकामी भर देण्यात येणार आहे. त्याकरिता “राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम” (NCAP) अंतर्गत 2 “डस्ट कंट्रोल यंत्रणा” घेण्यात आल्या आहेत. सदर यंत्रणाद्वारे शहरात धुळीचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी सातत्याने पाण्याचा फवारा करून धूलिकण कमी करण्यात मदत होणार आहे. त्याचबरोबर शहरातील रस्ते धुवून काढणे, दुभाजके धुवून काढणे तसेच दुभाजकांवरील झाडांना पाणी देणे तसेच त्यावर जमा झालेले धूलिकण, फुटपाथ वरील झाडांवर जमा झालेले धूलिकण कमी करणे, उंच झाडांना स्वच्छ ठेवण्यासाठी त्याचबरोबर सदर यंत्रणाचा वापर अत्यावश्यक परिस्थितीत आग विझवण्याकरिता करण्यात येणार आहे. सदर यंत्रणाच्या कार्यप्रणालीबाबत करण्यात आलेले सादरीकरण पाहून आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी समाधान व्यक्त केले.