युवराज मेश्राम, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर:- देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना, आजही देशातील असे काही भाग आहेत, तेथे स्वातंत्र्यदिनोत्सव म्हणजे काय, असा प्रश्न तेथील नागरिकांना पडतो. त्याअनुषंगाने जन संघर्ष समिती, नागपूरच्या वतीने गडचिरोलीतील अशा दुर्गम भागात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
सध्या सर्वदूर मुसळधार पाऊस बरसतो आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भाग पूरामुळे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. भामरागड तालुका पर्लकोटा नदीला आलेल्या पूरामुळे संपर्क यंत्रणेपासून दूर झाला आहे. त्याअनुषंगाने या भागात पोहोचण्याचे धाडस जन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी केले. भामरागडच्या वेशीवर असलेल्या पेरमीली येथील दुर्गम आदिवासी भागात तसेच खाणींचे साम्राज्य असलेल्या एटापल्लीतील काही गावांत पोहोचून स्वातंत्र्यदिनोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गाडीला महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या कटआऊट्सने वाहन सजविण्यात आले होते. बिरसा मुंडाचे कटआऊट दिसताच या भागातील आदिवासींच्या मनात उत्साह संचारला होता. येथील नागरिकांना राष्ट्रध्वज आणि मिठाईचे वाटप करण्यात येऊन ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ असा जयघोष करण्यात आला. यावेळी जन संघर्ष समितीचे दत्ता शिर्के , अभिषेक सावरकर , आशिष चौधरी , सुधांशु ठाकरे , जगदीश वानोडे, शुभम ढोंगले कार्यकर्ते उपस्थित होते.