विश्वास वाडे, चोपडा प्रतिनिधी
चोपडा:- शहराची सांस्कृतिक ओळख बनलेल्या ‘चोपडा शहर सामाजिक व सांस्कृतिक समितीच्या’ दहीहंडीचे वेध आबालवृद्धांना लागले आहे. रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने यंदाची दहीहंडी भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार आयोजकांनी केला असून त्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. चोपडा शहरासाठी समर्पित नेतृत्व असलेले माजी आमदार, प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे आणि शौर्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक सागरभाऊ ओतारी यांची उपस्थिती दहीहंडीचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा सण साजरा केला जातो. श्रीकृष्णाच्या खोड्यांची आठवण करुन देणारा दहीहंडीचा हा उत्सव चोपडा शहरात धुमधडाक्यात साजरा होतो. यात चोपडा शहर सामाजिक व सांस्कृतिक समितीकडून महात्मा गांधी चौकात आयोजित केली जाणारी दहीहंडी शहरासह तालुक्यात प्रतिष्ठेची मानली जाते. कोरोना संकटामुळे दोन वर्षांची प्रतीक्षा आणि यंदा दहीहंडी आयोजनाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने सर्वांच्याच उत्साहाला उधाण आले आहे. १९ ऑगस्ट, शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता दहीहंडीचा कार्यक्रम होईल. ‘गोविंदा आला रे आला’ असं म्हणतं दहीहंडी फोडण्यासाठी येणाऱ्या पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी समितीकडून नियोजन केले जात आहे. दहीहंडी म्हटली की उंची महत्वाची ठरते. उंचीवर दहीहंडी फोडतांना गोविदांकडून रचले जाणारे थर रोमांचित करणारे असतात. हा रोमांच अनुभवण्यासाठी विशेष क्रेन मागविण्यात आली आहे. दहीहंडीचा थरार अनुभवतांनाच गोविदांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्रधान्य देण्यात येणार हे विशेष. चोपडा शहराची सांस्कृतिक ओळख बनलेल्या या दहीहंडी महोत्सवात सहभागी होण्यासाठी गोविंदा पथकांनी छाभल गॅस एजन्सी किंवा गुंजन गिफ्ट ऍण्ड मोबाईल, गांधी चौक येथे नावनोंदणी करण्याचे आवाहन चोपडा शहर सामाजिक व सांस्कृतिक समितीने केले आहे.
केबल नेटवर्कवर होणार थेट प्रक्षेपण
चोपडा शहर सामाजिक व सांस्कृतिक समितीच्या या दहीहंडीचे थेट प्रक्षेपण चोपडा केबल नेटवर्कवर डिएल जीटीपीएलच्या केबल वरून ९७१ व १००१ या क्रमांकाच्या चॅनलवर घराघरात दिसणार आहे.
१५ हजार ५५५ रुपयांसह चषक मिळणार
चोपडा शहर सामाजिक व सांस्कृतिक समितीच्या दहीहंडीचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला १५ हजार ५५५ रुपयांसह दहीहंडी चषक बक्षीस दिला जाणार आहे.