✍️लेखिका: सरिता सातारडे, राह. नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन: विशेष लेख:- काही दिवसा अगोदर 14 एप्रिल ला माझ्या जयंतीचा 132 वा दिवस माझे अनुयायी आणि माझे अंधभक्त ही मोठ्या उत्साहाने साजरी करित आहे. माझे अनुयायी करतात मार्गक्रमण मी दिलेल्या दिशानिर्देशानुसार.. पण माझ्या अंधभक्तांचे काय… 3/4 वर्षापासून माझ्या बर्थडे चे फॅड सुरू केले या लोकांनी.. बाकायदा मोठ्ठया आकाराचा केक आणतात आणि तो कापून “Happy birthday babasaheb” म्हणतात.. खरचं मला प्रश्न पडतोय.. यांचे हे प्रताप बघून मी हसू की रडू… अरेरे… बर्थडे जीवंत माणसांचा करायचा असतो इतके साधेही यांना कळू नये.. आणि जर हे अंधभक्त म्हणत असतील की बाबासाहेब आमच्या हृदयात जीवंत आहे.. तर दाखवा तूमच्यातील बाबासाहेब मला.. काय केलेत आजवर समाजासाठी? किती गरीब मूलांच्या शिक्षणात मदत करता? किती भुकेल्यांना खाऊ घालता? किती संविधानाचे पालन करता? ‘कायदा माझ्या बापाचा’ इतके जोरजोरात ओरडून सांगता आणि स्वतःच कायदा ही मोडता? डिजेच्या तालावर मस्त धुंद होऊन नाचून जयंती साजरी करता..
अरे बाबांनो… कधी मला वाचलात कारे! वाचले असते मला तर हे केक चे आणि डिजेचे फॅड तूमच्या डोक्यात शिरलेच कसे असते? एखादा मुर्ख एखादी नवीन गोष्ट सुरू करतो आणि काहीही विचार न करता तूम्ही मेंढरे बनून अश्या गोष्टी करता? तूमची विवेकशक्ती जाग्रृत आहे का रे बाळानों? आज तूमच्या या अशा वागण्यामुळे मला खरोखरच अतीव दुःख होत आहे की का केले मी तुम्हाला गुलामगिरीतून मुक्त? अरे तुमचा तर जन्मच गुलामगिरीसाठी झालेला आहे.. आणि ती गुलामगिरी वेगाने तूमच्या अगदी गळ्यापर्यंत येऊन पोहचली आहे.
तूमच्या बौध्दगयेवर आजही पंडेपुजारांचा कब्जा आहे.. सांची चा स्तूप, महू, लुंबिनी, दिक्षाभूमी ही सारी ठिकाणी हळूहळू गिळंकृत करायला निघाली आहे ही प्रतिगामी मंडळी.. आणि तूम्ही चक्क बेभान होऊन नाचता? नागपूरचे अंबाझरी येथील माझे सांस्कृतिक भवन कोरोना काळात शासन, प्रशासनाच्या सहकार्याने पाडल्या गेले.लोकांना सांगतात ते, की वादळाने ते भवन पडले.. तूम्ही कधी येऊन बघितलात कारे त्या ठिकाणी.. कुठल्या वादळामध्ये ती क्षमता असते की भिंतीची एक एक वीट बाजूला पडेल? कुठल्या वादळात ती क्षमता असते की लोखंडी सळाखी कापल्या जाव्यात? कुठल्या वादळात ती क्षमता असते की काँक्रीटची भिंत कापल्या जाईल? तूम्हाला वाटत नाही का कधी ज्यांनी षडयंत्र करून हे सारे उध्वस्त केले त्यांना एकदा प्रश्न विचारावा??
लढत आहेत नागपुरच्या आंबेडकरवादी महिला आणि पुरुष मंडळी ही त्या महिलांना तितक्याच जोमाने साथ देत आहेत… अरे मीच तर २७ डिसेंबर १९२७ ला तूम्हाला सांगितले होते की, “घरप्रपंच्याच्या अडचणी ज्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष दोघेही मिळून सोडवितात त्याचप्रमाणे समाजाच्या संसाराच्या अडचणी ही स्त्री पुरूष दोघांनी मिळुन सोडवाव्यात” आणि माझे अनुयायी स्त्री – पुरूष दोघेही एकमेकांना साथ देत आहेत या लढ्यासाठी. मागच्या जवळपास तीन महिन्यां पासून या महिला, मायमाऊल्या लढत आहेत माझ्या आत्मसम्मानासाठी.. त्यांनाही घरदार आहे, मुलेबाळे आहेत.. तरीही त्या लढत आहेत.. खूप काही नाही.. तर एकदा कधीतरी त्यांच्या जवळ जाऊन.. ताई, आम्ही आहोत सोबतीला.. हा आशावाद बोलून दाखवा. लढा किंवा गुलाम बनून जगा हे दोनच मार्ग आहेत तूमच्याकडे.. काय निवडायचा तो निवडा.
अंधभक्तांनो, तूमचे काय! माझ्या बर्थडे चा केक आणि डिजे वर नाचून तूम्ही थकले नाहीत कारे! नाचून थकले असाल तर एकदा मला वाचून बघा.. बघा त्या उध्वस्त ढिगाऱ्याखालून मी आर्त हाक देतोय तूम्हाला! स्वाभिमानाने जगायचे असेल तर आता तरी डोळे उघडा! निट बघा डोळे उघडून आपल्या अवती भवती… गोड बोलून गळा कापणाऱ्यापासून सावध होऊन असे बेभान होणे सोडा.. मी जे काही केले तुमच्या साठी त्याची थोडीशी जरी जाणीव असेल तर आतातरी सावध व्हा! आतातरी सावध व्हा!
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348