सागर शिंदे वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- भारत-चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशात वापरी यांग बुंग नाला इस्ट कामेंग येथे सहकाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाशिम तालुक्यातील सोनखास येथील पॅरा कमांडो अमोल तानाजी गोरे या भारतीय सैनिकांना वीरमरण आले. याची माहिती नागरिकांना कळताच संपर्ण वाशिम जिल्हात शोक संवेदनांसह शहीद अमोल गोरे यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
वाशिम जिल्हातील सोनखास येथील सुपुत्र पॅरा कमांडो अमोल गोरे हे आपल्या सहकारी जवानाचे प्राण वाचवताना शहीद झाले. त्यांचे दोन सहकारी जवान चीन सीमेवर गस्तीवर असताना अरुणाचल प्रदेशातील कांमेंग व्हॅली येथे मुसळधार पाऊस आणि वेगाने वारे वाहत होते. यादरम्यान पाण्याचा मोठा प्रवाह त्यांच्या दिशेने आला. या प्रवाहात अमोल व त्याचे दोन सहकारी जवान वाहून जात असताना अमोलने जिवाची पर्वा न करता त्यांना पाण्याच्या प्रवाहातून वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात आपल्या दोन सहकारी जवानांना वाचविण्यात त्याला यश आले. मात्र, या प्रयत्नात अमोलच्या डोक्याला पाण्याच्या प्रवाहातील एक मोठा दगड लागल्याने तो गंभीर जखमी झाला. यातच अमोल गोरेला वीरमरण आले. अमोलच्या पश्चात पत्नी वैशाली, दोन मुले, शेतकरी असलेले वडील तानाजी गोरे, आई, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अमाेल याला आपल्या देशासाठी काहीतरी करायची जिद्द होती. त्यामुळे त्याने खडतर परिश्रम घेत सन २०१९ मध्ये अमोल भारतीय सैन्यात भरती झाला होता. अमोलचे लग्न वैशाली यांच्याशी सन २०१६ मध्ये झाले. अमोलने सैन्यात असताना पोहण्याचे प्रशिक्षणही घेतले होते. तो पोहण्यात तरबेज होता.
शहीद अमोल यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. याअगोदर वीर शहीद अमोल यांचे पार्थिव शरीर आज रात्री 2 वाजताच्या सुमारास विमानाने गुवाहाटी येथून पुणे येथे आणल्या गेले. पुणे येथे पोहोचताच त्याला सैन्याच्या वतीने मानवंदना दिल्यानंतर लष्कराच्या वाहनाने अमोलचे पार्थिव वाशिम तालुक्यातील सोनखास येथे सकाळी आणल्या गेले. शहीद अमोल गोरेवर सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला.
4 महिन्यांपूर्वी शहीद अमोलची अरुणाचल प्रदेश येथे पोस्टिंग झाली होती. अमोल 24 एप्रिल रोजी सुटीवर घरच्या मंडळींच्या भेटीसाठी येणार होता. तत्पूर्वीच त्याला वीरमरण आल्याने परिवाराची भेट घेण्याची त्याची इच्छा अधुरीच राहिली. अमोल सारखा धाडसी व मनमिळाऊ जवान शहीद झाल्याने संपूर्ण वाशिम जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

